धाटाव एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:46 AM2017-07-24T06:46:10+5:302017-07-24T06:46:10+5:30

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने

Road block of Old Mumbai MIDC | धाटाव एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण

धाटाव एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण

Next

धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. सर्वत्र खड्डे पडलेल्या रस्त्यावरून चालताना पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना कसरतच करावी लागत असून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून धाटाव औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांनी आता डोके वर काढले आहे. सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांनी दहशत निर्माण केल्याने वाहनचालकांना याचा मोठा त्रास होत आहे. तर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी रस्त्याची ठेकेदारांकडून केलेली तोडफोड व थातूरमातूर मलमपट्टी ही अपघातास कारणीभूत ठरत आहे. औद्योगिक वसाहतीतील रस्ते खाली व नाले वर राहिल्याने पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने रस्ते मात्र पाण्याखालीच राहत आहेत. रस्त्यालगतच्या मोऱ्या देखील ढासळल्याने दुचाकीचालकांना व कामगारांना त्या धोकादायक ठरत आहेत. रस्त्यावरील पथदिवे सुद्धा बऱ्याच वेळी काही ठिकाणी बंद अवस्थेत असल्याने चोरट्यांचाही मार्ग खुला झाला आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील वळणावर कारखानदारांनी लावलेल्या झाडाझुडपांचा अडथळा निर्माण झाल्यानेही अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्त्यावरील खड्ड्यातून रेती, खडी व ग्रीट टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असला तरी रस्त्यांची प्रकृती ढासळली असून अक्षरश: चाळण झालेल्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांना चांगलीच डोकेदुखी झाली आहे. विद्यार्थ्यांना सायकलवरून शाळेत जाताना या खड्ड्यांमुळे कसरत करावी लागत आहे. रस्त्यांची अवस्था लवकर सुधारली नाही तर सगळा रस्ता खड्डेमय होऊन पादचाऱ्यांचा व कामगारांचा प्रवास खडतर झाला आहे. या रस्त्यांबाबत औद्योगिक विकास मंडळाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे व अंतर्गत रस्ते पूर्णपणे नव्याने करण्यात यावे, अशी मागणी कामगारांकडून होत आहे.

Web Title: Road block of Old Mumbai MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.