खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:02 PM2020-02-10T23:02:53+5:302020-02-10T23:02:57+5:30
रहिवाशांसह चालक त्रस्त : सिडकोकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार
अरुणकुमार मेहत्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : मोबाइल कंपन्या, वीज वितरण तसेच जलवाहिन्या टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे कळंबोली वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आता महानगर गॅसवाहिनी टाकण्यासाठीही ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकही त्रस्त झाले आहेत. याबाबत सिडकोकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असून, कार्यवाही केली जात नसल्याने परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
पनवेल शहरासह सिडको वसाहतींमध्ये आता पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे. त्यानुसार महानगर गॅसकडून बºयाच ठिकाणी वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात येत आहे. खारघरनंतर कळंबोली वसाहतीमध्ये महानगरच्या भूमिगत गॅसवाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्यासाठी सिडकोची परवानगीही घेण्यात आली आहे. महानगर गॅसने सिडकोकडे रस्त्याचे खोदकाम आणि तोडफोड केल्यामुळे त्याबदल्यात पैसेसुद्धा भरलेले आहेत. त्यानुसार सिडकोने खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. परंतु ते न केल्यामुळे सद्यस्थितीत वसाहतीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
सेक्टर ९ अ आणि १० अ येथे महानगर गॅसने वाहिन्या टाकल्या आहेत. त्यासाठी रस्ते खोदले आहेत. मात्र गेल्या दीड-दोन महिन्यांपासून रस्त्यालगत माती पडली आहे. शिवाय रस्ताही पूर्ववत करण्यात आलेला नाही. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे जिकिरीचे बनले आहे. सेक्टर ९ अ येथील अमरांती सोसायटीच्या पाठीमागील रस्त्याची स्थितीही अतिशय बिकट झाली आहे. सेक्टर-१० अ येथील साई, तारा आणि सूरज रेसिडेन्सीमधील रहिवाशांच्या खोदकामाविषयी तक्रारी आहेत. तसेच सेक्टर ९ अ या ठिकाणच्या भूखंड क्रमांक नऊ ते अकरा या सोसायट्यांमधील रहिवाशांची खोदलेल्या रस्त्यांमुळे गैरसोय होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी केली जातात. यासंदर्भात नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला आहे. येथील रस्ते सुस्थितीत करावेत, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.
महानगर गॅसकडून खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच रहिवाशांना गैरसोय होणार नाही, यांची काळजी सिडको घेत आहे. खोदलेल्या ठिकाणी डांबर टाकण्याचे काम लवकरच करण्यात येईल .
- मिलिंद म्हात्रे,
कार्यकारी अभियंता, सिडको
खांदा वसाहतीतील रस्ते खड्ड्यांत
महानगर गॅसकडून खांदा कॉलनीतही वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यांनी सेक्टर ६, ७ आणि ९ येथील रस्ते खोदून ठेवल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात नगरसेविका सीता पाटील यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याला पत्र दिले आहे. जर हे रस्ते व्यवस्थित केले नाहीत, तर तुम्हाला रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पाटील यांनी सिडको अधिकाऱ्यांना दिला आहे.