मार्बल मार्केटमधील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:46 AM2019-08-07T02:46:33+5:302019-08-07T02:46:51+5:30
वाहन चालविणे जिकिरीचे; अवजड वाहनांमुळे रस्त्यांची चाळण
कळंबोली : कळंबोली मॅक्डॉनल्डपासून मार्बल मार्केटमधून तळोजा लिंक रोडला मिळणाऱ्या सर्विस रोडचे काम सिडकोने गेल्या वर्षी पूर्ण केले होते. वर्षभरात या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, त्यामुळे वाहने चालवणेही जिकिरीचे बनत चालले आहे. सिडकोने याकडे लक्ष देऊन हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी व्यापारी तसेच नागरिकांकडून होत आहे.
कळंबोली बाजूने कळंबोली सर्कल ते तळोजा लिंक रोड या दरम्यान अडीच कि.मी. लांबीचा सर्विस रोड कित्येक वर्षांपासून प्रस्तावित होता. त्यानुसार सिडकोने गेल्या वर्षी निविदा काढून ठेकेदारामार्फत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. कळंबोलीकरांच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय महत्त्वाचा, रहदारीचा बनला आहे. तसेच कामोठे आणि कळंबोली वसाहतींतील अंतर या रस्त्यामुळे कमी झाले आहे. रस्त्यांचे डांबरीकरण झाल्याने कळंबोलीकरांना वर्षभर दिलासा मिळाला होता; परंतु सद्यपरिस्थितीत रस्ता खड्ड्यात गेल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची खंत कळंबोलीकरांनी व्यक्त केली आहे.
पनवेलच नाही तर नवी मुंबई आणि रायगडमधील सगळ्यात मोठ्या मार्बल बाजारपेठेसाठीही याच रस्त्याचा वापर केला जातो. मुंबई, ठाणे, कोकण तसेच घाटमाथ्यावरूनही माल खरेदीसाठी व्यापाऱ्यांची वर्दळ असते. राज्यातून या मार्केटमध्ये लादी, ग्रेनाइट मार्बल आणि इतर माल येतो. मार्बल मार्केट आणि लिंक रोडवर जाण्यासाठी हा रस्ता जवळचा तसेच सुरक्षित असल्याने या रस्त्यावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. बाजूलाच पुरुषार्थ पेट्रोल पंप आहे. पेट्रोल-डिझेल भरण्याकरिता येथे चारचाकी तसेच अवजड वाहने येतात. सिडकोने सात कोटी रुपये खर्च करून डांबरीकरण केले; परंतु वर्षभरातच रस्ता खड्ड्यात गेल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे उघड झाले आहे. खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. वारंवार तक्रार करूनही सिडको याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील व्यापाºयांचे म्हणणे आहे.