रस्ते महामंडळाकडील ‘ती’ ११ गावे नैनाकडे
By admin | Published: April 14, 2016 12:22 AM2016-04-14T00:22:45+5:302016-04-14T00:22:45+5:30
खालापूर तालुक्यातील ११ गावे पुन्हा सिडकोच्या नैना प्रकल्पात वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. राज्य शासनाने खालापूर व पनवेल तालुक्यातील ८४ गावांचे २00 चौरस
- कमलाकर कांबळे, नवी मुंबई
खालापूर तालुक्यातील ११ गावे पुन्हा सिडकोच्या नैना प्रकल्पात वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. राज्य शासनाने खालापूर व पनवेल तालुक्यातील ८४ गावांचे २00 चौरस किलोमीटरचे क्षेत्र नियोजनासाठी रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीकडे वर्ग केले आहे. त्यामुळे नैना योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेल्या खालापूर स्मार्ट सिटीचा प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सिडकोने नगरविकास विभागाकडे आक्षेप नोंदविला होता. त्यानुसार राज्य शासनाने खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असलेली ‘ती’ ११ गावे पुन्हा नैनाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील २७० गावांतील सुमारे ६०० चौरस किलोमीटर क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोवर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार सिडकोने नैना प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून नैना प्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना सिडकोने आखली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश केला आहे, तर दुसऱ्या टप्प्यात समावेश असलेल्या खालापूर शहराचा स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकास करणार आहे. त्यानुसार ११ गावांचे एकत्रित प्रतिनिधित्व करणाऱ्या खालापूर नगरपंचायत, कलोटे मोकाशी ग्रामपंचायत आणि नादोडे ग्रामपंचायतीने नैना योजनेअंतर्गत ३५५0 हेक्टर जमिनीच्या लँड पुलिंगला संमती दिली आहे. गेल्या महिन्यात राज्य शासनाने प्रस्तावित स्मार्ट सिटीतील या ११ गावांसह खालापूर तालुक्यातील ८४ गावांच्या नियोजनाची जबाबदारी एमएसआरडीसीवर सोपविली होती. सिडकोच्या आक्षेपानंतर नगरविकास विभागाने खालापूर, महाड, शिरवली, निंबोडे, वडवे, नादोडे, निगडोली, कलोटे मोकाशी, कलोटे रयाती, विणेगाव आणि कंद्रोली टर्फ ही अकरा गावे पुन्हा नैनाकडे वर्ग केली आहेत.
प्रस्तावित पनवेल महापालिकेत खारघर नाही
प्रस्तावित पनवेल महापालिकेत सिडको नोडसह पनवेल तालुक्यातील जवळपास ७0 गावे समाविष्ट केली जाणार आहेत. तथापि नैनाच्या पहिल्या टप्प्यात समावेश असलेली २३ गावे प्रस्तावित महापालिकेत वर्ग करण्यास सिडकोने विरोध दर्शविला आहे. त्याचप्रमाणे खारघर नोडचा प्रस्तावित महापालिकेत समावेश करण्यासही सिडकोचा विरोध आहे. सिडकोने यासंदर्भातील आपला आक्षेप कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समितीकडे नोंदविला आहे. कळंबोली, कामोठे, काळुंद्रे आणि पनवेल नगर परिषदेचे क्षेत्र प्रस्तावित पनवेल महापालिकेत समाविष्ट करावे, अशी सूचनाही सिडकोने अभ्यास समितीला केली आहे.
पूर्वनियोजित प्रकल्पांना धक्का लागणार असेल तर नक्कीच आक्षेप घेतला जाईल. नैना योजनेअंतर्गत विकास होणाऱ्या खालापूर स्मार्ट सिटीतील ११ गावे रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आली होती. त्यावर आक्षेप नोंदविल्याने ही गावे नैना क्षेत्राकडे वर्ग करण्यात आली आहेत.
- व्ही. राधा,
सह व्यवस्थापकीय संचालिका, सिडको