फोर जी केबलसाठी पनवेलमध्ये रस्त्याचे खोदकाम
By admin | Published: July 25, 2015 10:35 PM2015-07-25T22:35:46+5:302015-07-25T22:35:46+5:30
पनवेल शहरातील तक्का परिसरात खाजगी मोबाइल कंपनीने फोर जी केबल टाकण्यासाठी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. ऐन पावसाळ्यात खड्डे खोदण्यात आल्याने
पनवेल : पनवेल शहरातील तक्का परिसरात खाजगी मोबाइल कंपनीने फोर जी केबल टाकण्यासाठी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. ऐन पावसाळ्यात खड्डे खोदण्यात आल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे.
रिलायन्स जीओ या कंपनीकडून केबल टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी अनेक मुख्य रस्त्यांवर ड्रीलच्या सहाय्याने मोठमोठे खड्डे केले जात आहेत. सुमारे १३ किमीच्या रस्त्यांवर खोदकाम करण्यात येणार असून यात बिग बझार ते तक्का गाव, साई मंदिर रोड, एनएमएमटी बस थांबा ते रेल्वे स्थानकापर्यंत हे खोदकाम होणार आहे.
वाहिन्या टाकताना नगरपरिषदेमार्फत संबंधित कंपनीला दिशानिर्देश दिले जातात, त्यानुसार रस्त्यांवर खोदकाम करणे आवश्यक आहे, मात्र हे दिशानिर्देश केवळ कागदोपत्रीच पाहावयास मिळत असून नगरपरिषदेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना याठिकाणी दिसत आहे. स्थानिक नगरसेवकही याबाबत आवाज उठवताना दिसत नसल्याने नागरिक नाराज आहेत.
पनवेल शहरात फोर जी केबल टाकण्यासाठी डीईपीएल आणि रिलायन्स जीओ या दोन कंपन्यांनी नगरपरिषदेकडे अर्ज केले होते. त्यानुसार मागील महिन्यात पार पडलेल्या पालिकेच्या सभेत हा विषय पटलावर घेण्यात आला होता. याबाबत नगरसेवक जयंत पगडे यांनी, ४२ व ४३ क्रमांकांचा विषय वादग्रस्त असल्याने संबंधित विषयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. शेवटी हरकत व सूचना न आल्याने या विषयाला मंजुरी देऊन रिलायन्सला परवानगी देण्यात आली.