शहरातील रस्ते बनले जॉगिंग ट्रॅक; व्यायामाविषयी नागरिकांमध्ये वाढती जागरूकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:06 AM2018-11-22T01:06:21+5:302018-11-22T01:06:37+5:30
नागरिकांमध्ये आरोग्याविषयी वाढत्या जागरूकतेमुळे सकाळच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : नागरिकांमध्ये आरोग्याविषयी वाढत्या जागरूकतेमुळे सकाळच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. परंतु नियोजनातील त्रुटींमुळे प्रत्येक नोडमध्ये व्यायामासाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यांची धावपट्टी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
२१ व्या शतकातले शहर म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईत नियोजनाचा मात्र अभाव दिसून येत आहे. शहराचा विकास करताना भविष्याचा वेध घेवून मूलभूत सुविधांची पूर्तता होणे आवश्यक होते. परंतु सिमेंटचे जंगल उभारण्याच्या प्रयत्नात त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दाखवलेल्या दिवास्वप्नांपैकी बहुतांश प्रकल्प कागदावरच राहिल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, चांगली उद्याने, खेळाची मैदाने यांचाही समावेश आहे. आरोग्य निरोगी राखण्यासाठी या सुविधा आवश्यक असतानाही अनेक नोडमध्ये त्या पुरवण्यात आलेल्या नाहीत. परिणामी अशा प्रत्येक नोडमधील रस्तेच जॉगिंग ट्रॅक बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षात शहरवासीयांमध्ये स्वत:च्या आरोग्याविषयी जागरूकता वाढलेली आहे. यामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनातही प्रत्येक जण स्वत:साठी सकाळच्यावेळी व्यायामासाठी घराबाहेर पडत आहे. त्यामध्ये लहान मुले, प्रौढ व तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा समावेश आहे.
सद्यस्थितीला नेरुळचे ज्वेल्स आॅफ नवी मुंबई, पामबीचलगतचा सर्व्हिस रोड, बालाजी टेकडी, पारसिक हिल, वाशीचे मिनी सीशोर, वंडर्स पार्क, घणसोली पामबीच मार्ग, कोपरखैरणे तलाव, ऐरोलीचा जॉगिंग ट्रॅक आदी ठिकाणांचा वापर व्यायामासाठी केला जातो. त्याशिवाय नोडमधील छोट्या-मोठ्या उद्यान व मैदानातही व्यायामासाठी अनेकांची गर्दी होते. मात्र या सर्वच ठिकाणी व्यायामासाठी येणाºयांची संख्या मागील काही वर्षात वाढत चाललेली आहे. त्यामुळे लगतच्या रस्त्यांवरही लोक व्यायामासाठी उतरू लागले आहेत. परिणामी पहाटे ५ वाजल्यापासून ते सकाळच्या ९ वाजेपर्यंत अनेक रस्ते व्यायामासाठी आलेल्यांमुळे गच्च भरल्याचे पाहायला मिळत आहेत. काही जण सायन-पनवेल तसेच ठाणे- बेलापूर मार्गाचाही वापर करत असल्याने त्यांना भरधाव वाहनांची धडक बसून अपघाताची दाट शक्यता असल्याने प्रत्येक नोडमध्ये स्वतंत्र जॉगिंग ट्रॅकसह सायकल ट्रॅकचीही आवश्यकता भासत आहे.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पालिकेने कोपरखैरणेसह इतर बहुतांश नोडमधील उद्यानांमध्ये व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले होते. कालांतराने उद्यानाच्या जागेत झालेल्या बदलामुळे हे साहित्य दिसेनासे झाले. तर मागील दोन - तीन वर्षांपासून पालिकेच्या निधीतून तसेच आमदार निधीतून ठिकठिकाणी ओपन जिमची संकल्पना अस्तित्वात आली आहे. त्याठिकाणी जमणाºया टवाळ टोळक्यांमुळे महिला व मुलींना अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय पुरेशा जागेअभावी इतरांनाही धावण्यासाठी रस्त्यावरच उतरावे लागत आहे. त्यांना व्यायामाचे सर्वच प्रकार रस्त्यावर अथवा पदपथांवर करावे लागत आहेत.
अनेक विभाग सुविधांपासून वंचित
शहर विकसित करताना काही मोजक्याच ठिकाणी सुविधा पुरवण्यावर भर दिला गेलेला आहे. यामुळे तुर्भेसारखी काही मूळ गावे व वाशी सेक्टर ३० सारखा काही परिसर सुविधांपासून वंचित आहे. बहुतांश झोपडपट्टी परिसरातही तीच परिस्थिती आहे. यामुळे अद्यापही अशा ठिकाणी खेळाची मैदाने अथवा उद्याने नसल्याने तिथल्या रहिवाशांची व्यायामाची देखील गैरसोय होत आहे.
इनडोर स्टेडियम, क्लब कागदावरच
घणसोली व जुहूगाव येथे इनडोर क्लब उभारणे प्रस्तावित आहे. मात्र अनेक वर्षांपासून त्यासंबंधीचा प्रस्ताव कागदावरच आहे. यामुळे देखील प्रशासनाकडून व्यायामासाठी आवश्यक सुविधा पुरवण्यात दिरंगाई होत आहे. परिणामी अनेक जण शरीरयष्टी बनवण्याच्या प्रयत्नात खिशाला झळ सोसत खासगी जिमची वाट धरत आहेत. तर प्रत्येक ठिकाणी अशा जिम नसल्यानेही अनेकांना पायपीट करावी लागत आहे.
शरीर निरोगी राखण्यासाठी चालण्यासह धावण्याचा व्यायाम महत्त्वाचा असल्याचे बहुतेकांना ज्ञात झाले आहे. यामुळे अनेक जण पहाटे व्यायामासाठी घराबाहेर निघत आहेत. परंतु जॉगिंगसाठी स्वतंत्र ट्रॅकची सोय नसल्याने रस्त्यावर धावावे लागत आहे. सिडको व महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही गैरसोय निर्माण झाली आहे.
-पांडुरंग पुकळे, घणसोली रहिवासी