- अरुणकुमार मेहत्रे
पावसाळा सुरू झाला तरी मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे. कर्नाळा अभयारण्य या ठिकाणी ओव्हर ब्रीजचे काम सुरू आहे. बाजूलाच रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ता कमकुवत बनला आहे. केव्हाही खचू शकतो. या ठिकाणी वाहनांची गती मंदावल्याने थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ठेकेदाराने आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावलेले नाहीत. खड्डे व रुंदीकरणाच्या कामामुळे वारंवार वाहतूककोंडी होत असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मुंबई-गोवा रोडवर वाहन चालवणाऱ्या चालकांना अपघात टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जाणारी व येणारी वाहतूक एकाच रोडवरून सुरू आहे. रोड अरुंद असून त्यावरही खड्डे पडले आहेत. वाहतूककोंडी झाली की एकाच ठिकाणी अडकून राहावे लागत आहे. महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे शिक्षा असल्याची प्रतिक्रिया चालक व प्रवासीही व्यक्त करत आहेत.