महामार्गावरील पथदिवे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:53 PM2019-02-23T22:53:12+5:302019-02-23T22:53:37+5:30
कळंबोली : सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे बंद असल्याचे वृत्त मध्यंतरी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे ...
कळंबोली : सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे बंद असल्याचे वृत्त मध्यंतरी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे पथदिवे सुरू करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पथदिवे पुन्हा बंद पडल्याने महामार्ग अंधारात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यताही बळावत आहे.
खड्ड्यामुळे सायन-पनवेल महामार्ग वादात सापडला होता. त्यामुळे खड्डेप्रवण क्षेत्रात काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. खड्डे बुजवण्यात येत असले तरी आता पथदिवे बंद झाल्याने रात्रीच्या वेळी चालकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते. ज्या ठिकाणी धोकादायक वळण, अपघातप्रवण क्षेत्र आहे, तेथील पथदिवे बंद आहेत.
कामोठे येथील उड्डाणपुलालगतचा सर्व्हिस रोड अंधारात आहे. त्यामुळे बसची वाट पाहणाऱ्या महिला प्रवाशांना अंधारात भीतीच्या छायेत उभे राहावे लागते. हीच परिस्थिती कळंबोली वसाहत, पुरुषार्थ पेट्रोलपंप, कोपरा आणि खारघर परिसरात आहे. कळंबोली वसाहतीत जाणाºया भुयारी मार्गातील दिवेही सध्या बंद आहेत. त्यामुळे पादचारी, प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे.
स्कायवॉकही अंधारात
महामार्ग ओलांडण्याकरिता कळंबोलीत सार्वजनिक बांधकाम विभागाने स्कायवॉक बांधला आहे. मात्र, येथील दिवे कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. हा स्कायवॉक गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांना असुरक्षित वाटते.
पनवेल-सायन महामार्गावरील पथदिवे बंद असतील, तर त्याबाबत त्वरित पाहणी केली जाईल आणि ते सुरू करण्यात येतील. कळंबोली, भुयारी मार्ग तसेच स्कायवॉक बाबतही माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
- किशोर पाटील,
कार्यकारी अभियंता, सा.बा. विभाग