कामोठ्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त !
By admin | Published: March 31, 2016 02:38 AM2016-03-31T02:38:55+5:302016-03-31T02:38:55+5:30
कामोठेतील रस्त्यांच्या दूरवस्थेवर ‘लोकमत’ने ‘झकास कामोठे भकास’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. याची दखल घेत सिडकोने बुधवारी खड्डे बुजविण्यासाठी निविदा
- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
कामोठेतील रस्त्यांच्या दूरवस्थेवर ‘लोकमत’ने ‘झकास कामोठे भकास’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. याची दखल घेत सिडकोने बुधवारी खड्डे बुजविण्यासाठी निविदा प्रसिध्द केली आहे. याकरिता २ कोटी ६१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने रस्त्याचा मधोमध छेद घेण्यात आला आहे. ते बुजण्याची तसदी खोदणाऱ्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कित्येक ठिकाणी केबल टाकण्याकरिता रस्ते उखडण्यात आले आहेत. मात्र उर्वरित डेब्रिज त्या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याने त्याचा त्रास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होत आहे. काही सेक्टरमध्ये चेंबरकरिता खोदकाम करण्यात आले. तिथे मातीच माती रस्त्यावर पसरली आहे. सेक्टर २० मध्ये इमारतीतील सांडपाणी वाहून नेण्याकरिता जोडणी करण्याचे काम सुरू आहे. याकरिता रस्त्याच्या मध्यभागी खड्डा करण्यात आलेला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. सेक्टर-२१ येथे हावरे निर्मितीसमोर पाइपलाइन टाकण्याकरिता मोठे खोदकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे वाहनांना येण्या- जाण्याकरिता मोठी कसरत करावी लागत आहे. कामोठे वसाहतीत खाजगी मोबाइल कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले आहेत. फोरजी, थ्रीजी, जल आणि मलनि:सारण वाहिन्या टाकताना अनेक ठिकाणी रस्त्यांची दूरवस्था झाली असून ही वस्तुस्थिती सिडको अधिकाऱ्यांनी सुध्दा मान्य केली आहे.
दरम्यान, सिडकोने वसाहतीतील विविध सेक्टरमधील खड्ड्यांचा भरणा तसेच रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याची माहिती अधीक्षक
अभियंता किरण फणसे यांनी यावेळी दिली.
कामोठे वसाहतीतील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. सिडकोने आतापर्यंत रस्त्याचे इतके मोठे काम काढले नव्हते. मात्र ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत सिडकोने रस्त्यांकरिता निविदा प्रसिध्द केली ही बाब महत्त्वाची आहे.
- गोरक्ष आहेर,
उपशहर प्रमुख, शिवसेना, कामोठे
पावलापावलावर रस्ते खोदण्यात आले आहेत. याकरिता सिडकोकडून कोणावर नियंत्रण ठेवण्यात आलेले नाही. मात्र सिडको रस्ते खड्डेमुक्त करणार आहे. या कामाचे क्रे डिट ‘झकास कामोठे भकास’ या ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेला जाते.
- विपुल डुंबरे,
रहिवासी कामोठे
घर तसे अंगण आणि शहर तसे रस्ते यावरून सगळे मूल्यमापन होते. कामोठे वसाहतीत रस्त्यांची वाईट स्थिती आहे याला कारणीभूत सुध्दा सिडकोच आहे. मात्र ‘लोकमत’ने कामोठे वसाहतीतील रस्त्यांची समस्या मांडली आणि सिडकोला मोठा दणका दिला, त्याबद्दल ‘लोकमत’चे आभार.
- स्वप्नाली म्हात्रे, रहिवासी