नेरळ : शहराच्या पूर्व भागात असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटी स्थानक येथे येणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण व्हावे, यासाठी नेरळ एसटी स्थानकातून रिक्षा वाहतूक करणारे रिक्षाचालक, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषण केले होते. दरम्यान, उपोषण सोडताना रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकारी वर्गाने रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन फोल ठरल्याने वाहनचालक आणि एसटी गाड्यांना रस्ता पार करणे कठीण होऊन बसले आहे.
नेरळ-कळंब रस्त्याने नेरळ एसटी स्टॅण्डकडे जाणारा रस्ता असून त्या रस्त्याने नेरळ रेल्वे स्टेशन आणि नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र हेदेखील आहेत. मात्र, त्या रस्त्याने राज्य परिवहन मंडळाच्या एसटी गाड्या कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात जात असतात. त्या एसटी गाड्या दिवसभरात असंख्य फेऱ्या मारत असतात. त्या एसटी स्थानक आणि नेरळ रेल्वे स्थानक या ठिकाणी पोहोचण्यासाठी ग्रामीण भागातील किमान ४५-५० गावांतील लोक हे ये -जा करीत असतात. मात्र, त्या रस्त्याने वाहतूक करणे रस्त्यावरील खड्ड्यांनी कठीण होऊन बसले आहे. कारण या ४०० मीटर रस्त्याचे गेल्या अनेक वर्षांत अखंड डांबरीकरण करण्यात आले नाही. रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या या रस्त्यावरून किमान २०० रिक्षा प्रवाशांच्या सेवेत असतात.या स्थानकातून कळंब आणि कशेळेपर्यंत या एसटी स्थानकातून रिक्षा आणि व्हॅन या गाड्या प्रवासी वाहतूक करीत असतात. त्या सर्व गाड्या नेरळ-कळंब या मुख्य रस्त्याला येण्यासाठी जो मार्ग पकडतात, त्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून हे खड्डे अनेक वर्षांपासून तसेच आहेत. गतवर्षी रिक्षाचालकांनी रस्त्यावरील खड्डे स्वत:च्या खर्चाने भरले होते, तर जिल्हा परिषदेने रस्त्याचे काम करताना डांबरीकरण न करता ते थेट काँक्रीटचा रस्ता करावा, अशी मागणी रिक्षाचालक करीत आहेत.वर्षापासून मागणी करूनदेखील जिल्हा परिषद लक्ष देत नसल्याने जानेवारी २०१९ मध्ये येथील रिक्षाचालकांनी उपोषण केले होते. एक दिवस तर २०० हून अधिक रिक्षांनी वाहतूक बंद केली होती, तर दुसºया दिवशी रात्री उशिरा रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी येऊन लेखी पत्र देऊन उपोषण सोडले होते. त्या वेळी रायगड जिल्हा परिषदेने आश्वासन दिल्याप्रमाणे नेरळ एसटी स्टॅण्डकडे जाणाºया रस्त्याचे काँक्रीटचे काम आजपर्यंत सुरू केले नाही. ४०० मीटरचा रस्ता तयार करण्याची कार्यवाही केली जाईल हे आश्वासन देणारे रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. ए. केदार हे निवृत्तही झाले आहेत, त्यामुळे उपोषणकर्त्यांची फसवणूक झाली असून, आज रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणेही कठीण होऊन गेले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला खोलगट भाग यामुळे वाहने खड्डे चुकविताना थेट शेतात जात आहेत.त्यामुळे रस्त्याची गरज असताना जिल्हा परिषद बांधकाम विभाग काहीही करण्याच्या स्थितीत नसल्याने रस्त्याने वाहतूक करणारे वाहनचालक आणि रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत.आम्ही रस्ता व्हावा, म्हणून उपोषणे केली; पण केवळ आश्वासन दिले, तीदेखील पाळली नाहीत. त्यामुळे आमच्या भावनांचा खेळ अधिकारी वर्गाने मांडला असून, आम्ही आता याहून मोठे आंदोलन करू.- श्रावण जाधव,अध्यक्ष,जय मल्हार रिक्षा संघटनाआम्ही सर्व कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषदेकडे पाठवली आहेत, त्यांच्याकडून ते मंजूर होऊन आल्यास रस्त्याचे काम होईल.- पी. गोपणे,शाखा अभियंता,बांधकाम विभाग,रायगड जिल्हा परिषद