महापे एमआयडीसीत रस्त्यांची चाळण; उद्योजकांची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:35 PM2019-10-30T23:35:22+5:302019-10-30T23:35:29+5:30
वाहतूककोंडीमुळे अपघाताची शक्यता वाढली
नवी मुंबई : ठाणे - बेलापूर पट्टीटीतील टीटीसी एमआयडीसी परिसर म्हणजे सर्वात मोठी औधोगिक नगरी म्हणून ओखळली जाते. या औद्योगीक वसाहतीतील रस्त्यांची मात्र दैना झाली आहे. त्याचा फटका या परिसरातील उद्योगांवर झाला आहे. वाहनचालक आणि येथील कर्मचाऱ्यांना येथून ये-जा करताना कसरत करावील लागत आहे.
एमआयडीसी क्षेत्रातील बहुतांशी रस्ते खड्ड्यात गेले आहेत. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांची अडथळयाची शर्यत सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. खड्ड्यात पाणी साचून डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावणे परिसरात बंद पडलेल्या कृष्णा स्टील कंपनी रोड जवळील मोकळ्या भूखंडावर ज्वलनशील केमिकल्स ने भरलेले कंटेनर उभे केले जातात. तसेच याच परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी बेवारस वाहने पार्क केली आहेत. अगोदरच रस्त्यांची अवस्था दैयनीय झाली असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता वाढली आहे. या सर्वाचा परिणाम या क्षेत्रातील उद्योजकांना भोगावा लागत आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे या क्षेत्रात येणाºया वाहनांची कोंडी होत आहे. अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्त्यांबरोबरच या क्षेत्रात इतर अनेक समस्या निर्माण झाल्याने व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापे, रबाले आणि पावणे एमआयडीसीचा काही भाग नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असले तरी एमआयडीसी अंतर्गत असलेल्या काही रस्त्यांची दुरुस्ती व इतर समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. - एम. एस. कलकुटकी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी महापे