नवी मुंबईत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; जालन्यातील लाठीहल्याचाही निषेध
By नामदेव मोरे | Published: September 5, 2023 11:45 AM2023-09-05T11:45:57+5:302023-09-05T11:46:32+5:30
जालनामधील घटनेचे पडसाद नवी मुंबईत ही पडू लागले आहेत.
नवी मुंबई : जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्याचा निषेध व मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत रास्ता रोको करण्यात आले. सकल मराठा समाज च्या माध्यमातून नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.
जालनामधील घटनेचे पडसाद नवी मुंबईत ही पडू लागले आहेत. प्रतिदिन विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत. सकल मराठा समाज व मराठा समन्वय समिती नेरूळ यांच्या माध्यमातून नेरूळबंद ची हाक देण्यात आली होती. पण गोकुळअष्टमीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बंद ऐवजी रास्ता रोको चा निर्णय घेण्यात आला. सकाळी नेरूळमधील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात जालनामधील लाठीहल्याचा निषेध करण्यात आला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणीही आंदोलकांनी केली. रोडवरच बैठक मारल्याने काही वेळ या मार्गावरील वाहतूक बंद होती. आंदोलनात दत्तात्रय फडतरे ,स्वप्नील घोलप , संजय संपकाळ , नितिन नाईकडे , अशोक पावडे , करण पाटील , राहुल जगदाळे , राजु मांडरे ,विनायक पिंगळे , रामा मुंढे , विशाल मोरे नितेश गवाणे , गजानन खिल्लारे, गणेश पाटील, अनिकेत औटी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.