एमआयडीसीतील रस्ते झाले चकाचक, महापालिकेचा उद्योजकांना दिलासा

By कमलाकर कांबळे | Published: May 4, 2023 07:31 PM2023-05-04T19:31:09+5:302023-05-04T19:32:51+5:30

महापालिका आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त सहभागातून उर्वरित रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे.

Roads in MIDC have become shiny, the corporation is a relief to the entrepreneurs | एमआयडीसीतील रस्ते झाले चकाचक, महापालिकेचा उद्योजकांना दिलासा

एमआयडीसीतील रस्ते झाले चकाचक, महापालिकेचा उद्योजकांना दिलासा

googlenewsNext

नवी मुंबई - नियोजन प्राधिकरण या नात्याने नवी मुंबई महापालिकेने टीटीसी औद्योगिक क्षेत्रात रस्ते आणि विविध सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत १,५२० कोटी रुपये खर्च केले आहेत. रस्ते व्हिजनच्या तीन टप्प्यात औद्योगिक क्षेत्रातील १३६ कि.मी.पैकी ८३.९८ कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. महापालिका आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त सहभागातून उर्वरित रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे.

महापालिका क्षेत्रात एकूण ५०५ कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी एमआयडीसी क्षेत्रात जवळपास १३६ कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील शीळ- महापे रस्ता वगळता इतर रस्ते एमआयडीसीने २५ नोव्हेंबर २००४ रोजी नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. तेव्हापासून एमआयडीसीतील रस्ते वेळोवेळी दुरुस्त करून सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी महापालिकेकडून पार पाडली जात आहे. तसेच १ डिसेंबर २००५ च्या करारनाम्यानुसार एमआयडीसीने ठाणे-बेलापूर रस्ताही महापालिकेकडे हस्तांतरित केलेला आहे. त्यानुसार १३.८० कि.मी. लांबीच्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही महापालिकेने पूर्ण केले आहे. त्यासाठी जवळपास १६२ कोटी रुपये खर्च केले आहेत.

सध्या औद्योगिक क्षेत्रातील ३० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. यापैकी पंधरा कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम एमआयडीसीच्या माध्यमातून केले जात आहे. तर उर्वरित १५ कि.मी. रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने कंबर कसली आहे.

सध्या २१० कोटींची कामे सुरू -
महापालिकेद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या १५ कि.मी. रस्त्यापैकी दिघा, कोपरखैरणे, तुर्भे व नेरूळ एमआयडीसी क्षेत्रातील ११.५५ कि.मी. रस्त्याचे काँक्रिटीकरण, गटारे व पदपथ कामासाठी महापालिकेने २१० कोटी रकमेच्या कामाचे कार्यादेश दिले आहेत. यामध्ये दिघा बिस्कीट गल्ली, कोपरखैरणे क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक झोनमधील एल ॲण्ड टी रोड, पावणे एमआयडीसी, महापे एमबीपी रोड, एव्हरेस्ट आयटी पार्कसह तुर्भे एमआयडीसी क्षेत्रातील गणपती पाडा, आंबेडकरनगर व नेरूळ टीटीसी क्षेत्रातील केमिकल अल्कली झोन परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे. ही विकासकामे अंतिम टप्प्यात आली असून पुढील दोन ते तीन आठवड्यात ती पूर्ण होतील, असा विश्वास महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी व्यक्त केला आहे.

तीन टप्प्यात रस्त्यांचा विकास -
पहिल्या टप्प्यात टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एकूण १३६ कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी ८३.९८ कि.मी. रस्त्यांची महापालिकेने सुधारणा केली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २१.२८ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची एमआयडीसीकडून सुधारणा केली जात आहे. निवासी क्षेत्रात अंतर्भूत असणारा २१.२८ कि.मी. लांबीचा हा रस्ता महापालिकेने एमआयडीसीकडे हस्तांतरित केला आहे. त्यानुसार एमआयडीसीने या रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. तिसऱ्या टप्प्यात उर्वरित ३० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे समप्रमाणात विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून १५ कि.मी. रस्त्यांच्या सुधारणेसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. तर एमआयडीसीनेसुद्धा १५ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी कंबर कसली आहे.

औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. पूर्वी या क्षेत्रातील बहुतांशी रस्ते अस्फाल्टिंगचे होते. आता ते कॉंक्रीटचे करण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेने आतापर्यंत १,५३० कोटी रुपये खर्च केले आहेत.
- संजय देसाई (शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका)
 

Web Title: Roads in MIDC have become shiny, the corporation is a relief to the entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.