नवी मुंबई : एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे बहुतांश ठिकाणच्या रस्त्यांची गेली अनेक वर्षांपासून दुरुस्ती होऊ न शकल्याने संपूर्ण रस्तेच खड्ड्यात गेले आहेत. त्या ठिकाणी सांडपाणीही साचत असल्याने जागोजागी तळे तयार झाल्याचे दृश्य नजरेस पडत आहे.अशिया खंडातील सर्वाधिक मोठा औद्योगिक पट्टा सुविधांच्या बाबतीत अद्यापही दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, मागील काही वर्षांत अनेक कंपन्या नवी मुंबईबाहेर स्थलांतरितही झाल्या आहेत. अशातच उर्वरित कंपन्यांच्या कामगारांनाही असुविधांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये रस्त्याची समस्या सर्वाधिक डोकेदुखीची ठरताना दिसून येत आहे. असेच भीषण दृश्य रबाळे एमआयडीसी परिसरात पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणच्या ए २२७ क्रमांकाच्या प्लॉट लगतचा रहदारीचा रस्ताच पूर्णपणे खड्ड्यात गेलेला आहे. यामुळे छोट्या वाहनांची त्या ठिकाणची रहदारीही बंद झालेली आहे. मात्र, मोठ्या वाहनांना पर्यायी त्याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे. यामध्ये रस्ता अधिक खचला जाऊन त्यावरील खड्ड्यांचा आकार दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याची भावना परिसरातून ये-जा करणाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.अशातच काही कंपन्यांकडून त्यांचे सांडपाणी रस्त्यावरच सोडले जात आहे. तर काही ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या फुटल्या असून, त्यामधील दूषित पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. हे सांडपाणी खड्ड्यांमध्येच साचून राहत असल्याने त्या ठिकाणी डासांची पैदास होत आहे. यामुळे परिसरातील कंपन्यांमध्ये काम करणाºया कामगारांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.मालाच्या वाहतुकीमुळे एमआयडीसी परिसरात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यांचा भार पेलू शकतील, अशा दर्जाचे रस्ते एमआयडीसी परिसरात बनवले जाणे गरजेचे आहे. तशा प्रयत्नातून काही वर्षांपूर्वी पालिकेकडून तसेच एमआयडीसी प्रशासनाकडून रस्त्यांचे काँक्रीटीकरणही करण्यात आले होते. तर काही ठिकाणी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून टिकावू रस्ते बनवण्याचाही प्रयत्न झाला होता. यानंतरही ते रस्ते खड्डेमय होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, दुरुस्तीच्या बाबतीत केवळ प्रमुख रस्त्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. परिणामी, कंपन्यांसमोरील जोडरस्त्यांची डागडुजी दुर्लक्षितच राहिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेले रस्तेच पूर्णपणे खड्ड्यात गेले आहेत; परंतु या रस्त्यांची डागडुजी नेमकी करणार कोण, असा प्रश्न सर्वसामान्य कामगारवर्गाला पडला आहे.>सुविधांची मागणीऔद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांकडून महापालिका कर वसूल करत असल्याने पालिकेनेच तिथे सुविधा पुरवाव्यात, अशी उद्योजकांची मागणी होती. त्यावरून पालिका आणि उद्योजक यांच्यात अनेक वर्षे वादही सुरू होता.कालांतराने पालिकेने तिथल्या रस्त्यांची व गटारांची कामेही हाती घेतली होती; परंतु मागील काही वर्षांपासून पुन्हा एमआयडीसीतील रस्ते दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे.>काही कामानिमित्ताने एमआयडीसी परिसरात जायचे झाल्यास रस्त्यांवरील खड्ड्यांची भीती वाटत आहे. खड्ड्यांमधून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात वाहने आदळून नुकसान होत आहे. तर रात्रीच्या वेळी खड्डे दिसून येत नसल्याने अपघातांचीही भीती सतावत आहे. तर काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये दूषित पाणी साचल्याने रस्त्यांचे रूपांतर तळ्यांमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. या समस्येकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज भासत आहे.- अशोक काटे, नागरिक
एमआयडीसीतील रस्ते गेले खड्ड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 12:57 AM