- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : बेपत्ता शहरातील रिक्षांची वाढती संख्या व लॉकडाऊननंतर भाडे मिळवण्यासाठी त्यांच्यातली चढाओढ, यामुळे जागोजागी अनधिकृत थांबे तयार झाले आहेत. काही ठिकाणी अधिकृत थांबे असतानाही त्याला लागूनच रस्त्यांवरही रिक्षांच्या रांगा लागत आहेत. यामुळे बहुतांश ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. शहरातील प्रत्येक नोडमधील महत्त्वाच्या मार्गांवर सकाळ, संख्याकाळ हे चित्र पाहायला मिळत आहे. या संदर्भात अनेकांनी आरटीओ, तसेच वाहतूक पोलिसांकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत.
ऐरोली रेल्वे स्थानक : या रेल्वे स्थानकाच्या दुतर्फा रिक्षा चालकांनी मोकळ्या जागेत थांबा तयार केला आहे. त्या ठिकाणी नागरिकांच्या, तसेच वाहनांच्या रहदारीला अडथळा होईल, अशा बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या केलेल्या असतात.
रेल्वे स्थानकातून बाहेर पाऊल टाकताच रिक्षाच्या गर्दीतून वाट काढावी लागते. अनेकदा त्यांच्या मुजोरी स्वभावाला नागरिकांना सामोरे जावे लागते. - राहुल देशमुख, रहिवाशी
बेशिस्त चालकांवर कारवाईसाठी फ्लाइंग स्कॉड कार्यरत करण्यात आले आहे. त्याद्वारे आठवड्याभरात चाळीस रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे, तर अवैध थांबे, प्रवाशीऐवजी मालवाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली जाणार आहे. - हेमांगी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई
घणसोली रेल्वे स्थानक : स्थानकाच्या पश्चिमेला रिक्षा थांब्यावर एकाच संघटनेच्या रिक्षा उभ्या आहेत. इतर रिक्षाचालकांनी रस्त्यावर दोन ठिकाणी अवैध थांबे तयार केले आहेत. भाडे मिळविण्याच्या प्रयत्नात रहदारीला अडथळा होईल, अशा रिक्षा उभ्या आहेत.
एखाद्या प्रवाशाबरोबर वाद झाल्यास घरापर्यंत पाठलाग करून रिक्षावाले त्रास देतात. - संपत घोलप, रहिवासी
नेरुळ एलपी पूल : डी.वाय. पाटील स्टेडियमलगत अधिकृत रिक्षा थांबा असताना, तेथे अवैधरीत्या बस उभ्या राहत असल्यानेदुसऱ्या लेनमध्ये रिक्षाच्या रांगा लागत आहेत. यामुळे रहदारीलाही अडथळा निर्माण होऊनसर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे.
थांब्यावर मर्यादेपेक्षा जास्त रिक्षा उभ्या होत असल्याने वाहतूककोंडी होत आहे. - सुहास मिंडे, रहिवाशी
सानपाडा रेल्वे स्थानक : एपीएमसी मार्केटला जोडणारे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने येथे नागरिकांची वर्दळ असते. स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूला रस्त्यावरच रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे सातत्याने वाहतूककोंडीची समस्या भेडसावत असते.
अनेकदा रिक्षाचालकांच्यात आपापसात वाद होतात. त्याचा त्रास नागरिकांना होतो. -उमेश पवार, रहिवाशी
एम.जी. कॉम्प्लेक्स : अगोदरच अरुंद असलेल्या वाशी कोपरखैरणे मार्गावर जागोजागी रिक्षा थांबे तयार झाले आहेत. त्यात वाशीतील एम.जी. कॉम्प्लेक्स येथे रहदारीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात आहेत.
जुहूगाव परिसरात जागा मिळेल तिथे रिक्क्षा उभ्या केल्याने कोंडी होते. - विजय ताम्हाणे, रहिवाशी