कळंबोली : पनवेलहून खांदा वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहिवासी व वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. डांबरीकरण होईल तेव्हा होईल पहिले खड्डे बुजवा, अशी प्रतिक्रि या येथील रहिवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेट येथील सीएनजी पंपापासून सेक्टर ११ सीकेटी महाविद्यालय, सेंट जोसेफ हायस्कूल तसेच पुढे खांदा वसाहतीत हा रस्ता जातो. या रस्त्याचे डांबरीकरण होवून अनेक वर्षे उलटली आहेत, तरीही सिडकोकडून कोणतीही डागडुजी करण्यात आली नाही. या रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणाºया रहदारीमुळे रस्ता खराब झाला आहे. खांदा वसाहतीत सेंट जोसेफ शाळा आहे. मुलांना सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हॅन ची ये - जा चालू असते, तर सेक्टर ११ येथेही सीकेटी कॉलेज आहे. या रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रेल्वे पुलाखालील रस्त्यावर चाळण झाली आहे. खड्डे चुकवण्यासाठी वाहचालकांच्या कसरतीमुळे अपघातास एक प्रकारे निमंत्रण मिळत आहे. खड्ड्यांमुळेही दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. पावसाळ्यात तर रस्त्यावर तलावाचे स्वरूप प्राप्त होते. तेव्हा चालणेही जिकरीचे बनते. सिडकोने पावसाळ्याअगोदरच या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे. सिडकोने पावसाळ्याअगोदर रस्त्यांची कामे करून घेणे आवश्यक आहे, परंतु दरवर्षी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे मत श्रीपाद साठे या रहिवाशाने व्यक्त केले.
सीएनजी पंपापासून रेल्वे पुलाखालून खांदा वसाहतीत जाणाºया अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. हा रस्ता रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येतो की नाही याची चौकशी करण्यात येईल. आमच्या अखत्यारीत येत असेल तर लवकरच या रस्त्याची डागडुजी करण्यात येईल. - व्ही. एल. कांबळी, कार्यकारी अभियंता, नवीन पनवेल सिडको