सानपाड्यातील रस्त्यांची दुरवस्था, महापालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:24 AM2018-12-08T00:24:33+5:302018-12-08T00:24:40+5:30
सानपाडा नोडमधील अनेक रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील अनेक रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, तसेच रस्त्यातील मॅनहोल जवळ पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने आदळून अपघात होण्याची शक्यता असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
सानपाडा नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. या भागातून पामबीच मार्ग, एपीएमसी मार्केट, सायन-पनवेल महामार्ग आदी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सानपाडा रेल्वेस्थानकामधून वाहनांसाठी भुयारी मार्ग असल्याने या ठिकाणीही वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. या भुयारी मार्गाजवळील रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे, तसेच सानपाडा नोडमधील अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात सानपाडा सेक्टर-५ आणि सेक्टर-८ मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरु स्त करण्यासाठी महापालिकेने रस्त्यांची डागडुजी केली होती; परंतु रस्त्यात असलेल्या मलवाहिन्यांच्या मॅनहोलची उंची न वाढविल्याने मॅनहोलच्या झाकणांजवळ खड्डे पडले आहेत, त्यामुळे रस्त्याने ये-जा करणारी वाहने आदळत असून, दुचाकी सारख्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, महापालिकेने मॅनहोलच्या झाकणांजवळील खड्ड्यांची उंची वाढवून सानपाडा नोडमधील अंतर्गत सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.