रस्ते, पदपथांवर होणार ६३४ कोटी रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:05 AM2020-02-21T00:05:16+5:302020-02-21T00:05:26+5:30
अर्थसंकल्पात १५४ कामांचा समावेश : एमआयडीसीलाही प्राधान्य
नामदेव मोरे
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील तब्बल ६३४ कोटी रुपये अडथळामुक्त रस्ते व पदपथ बांधण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. एमआयडीसीमधील रस्त्यांसाठीही २२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पामबीच रस्त्याला लागून सायकल ट्रॅकही प्रस्तावित केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी अर्थसंकल्पात मोठ्या प्रकल्पांऐवजी अत्यावश्यक सुविधांना प्राधान्य दिले आहे.
शहरवासीयांना अडथळामुक्त रस्ते व पदपथ उपलब्ध व्हावेत यावर लक्ष केंद्रित केले आहे. सर्वाधिक खर्च या कामांसाठी होणार आहे. वास्तविक महापालिकेच्या प्रत्येक अर्थसंकल्पात या कामांना झुकते माप दिले जाते. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. नागरिक व लोकप्रतिनिधींकडूनही याच कामांची मागणी असते. मागील काही वर्षांमध्ये अडथळामुक्त पदपथांना प्राधान्य दिले जात आहे. पण प्रत्यक्षात अनेक पदपथांचा चालण्यासाठी वापरच करता येत नाही.
काही ठिकाणी पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे सर्व खर्च व्यर्थ जात आहे. शहरातील रस्त्यांचे काम व मलनि:सारण वाहिनी, जलवाहिनी, मोबाइल कंपन्या व इतर कंपन्यांचे काम यामध्ये समन्वय नसतो. यामुळे महापालिका रस्ता बनविते. मात्र बनविलेला रस्ता विविध कारणांसाठी खोदला जातो व पुन्हा तोच रस्ता बनविण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. या वर्षी बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, घणसोली, दिघा व एमआयडीसी परिसरात तब्बल १५४ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यासाठी ६३४ कोटी ३१ लाख रुपयांची तरतूद केली आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये या कामांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
पामबीच रोड हा शहरातील सर्वांत महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याला लागून सायकल ट्रॅक बनविणे प्रस्तावित आहे. या कामासाठी १९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पालिकेने यापूर्वी तुर्भे व वाशीमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. पुढील वर्षभरामध्ये नेरूळ परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असून त्यासाठी ९५ कोटींची तरतूद केली आहे. ठाणे - बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कामांनाही प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. या परिसरामध्ये अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. काही कामे पूर्ण झाली असून काही सुरू आहेत. शिल्लक कामे पुढील वर्षभरामध्ये पूर्ण केली जाणार असून त्यासाठी जवळपास २२८ कोटी खर्च होणार आहेत.
रस्ते व पदपथांच्या कामांचा तपशील
विभाग प्रस्तावित कामे अपेक्षित खर्च (कोटी)
बेलापूर २९ ३९.१९
नेरूळ ६ १३७
वाशी ४९ ८१.०८
तुर्भे, सानपाडा ३४ ४०.४८
घणसोली १२ २२.४१
दिघा, ऐरोली ११ ८५.१७
एमआयडीसी १३ २२८.९४
प्रत्यक्ष पाहणी व्हावी
महापालिकेने अडथळामुक्त पदपथ या उपक्रमाअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून पदपथ तयार केले आहेत. परंतु अनेक ठिकाणी पदपथांवर गॅरेज, फेरीवाले व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. पदपथांचा वापर चालण्यासाठी होत नसल्याने पालिकेचा खर्च व्यर्थ गेला आहे. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या कामांचे सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.