स्कूलबस पार्किंगसाठी रस्ते आंदण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:05 AM2018-08-09T03:05:36+5:302018-08-09T03:05:40+5:30

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी शाळांकडून वापरली जाणारी वाहने उभी करण्यासाठी रस्त्यांचा वापर होत आहे.

Roadside to school bus parking | स्कूलबस पार्किंगसाठी रस्ते आंदण

स्कूलबस पार्किंगसाठी रस्ते आंदण

googlenewsNext

- सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी शाळांकडून वापरली जाणारी वाहने उभी करण्यासाठी रस्त्यांचा वापर होत आहे. पार्किंगच्या नावाखाली घेतलेल्या भूखंडावरही अनेक शाळांनी इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे बहुतांश खासगी शाळांच्या भोवतीच्या रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यासंदर्भात पोलिसांनी सूचना करून देखील वाहने उभी करण्यासाठी शाळांकडून पर्यायी उपाययोजना होत नसल्याचेही दिसून येत आहे.
शहरातील वाढत्या शिक्षण संस्थांमुळे पुण्यानंतर नवी मुंबई हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जावू लागले आहे. देशभरासह आंतरराष्टÑीय स्तराच्या अनेक शैक्षणिक संस्थांनी शहरात शाळा व महाविद्यालये सुरू केली आहेत. त्याकरिता सिडकोकडून अल्पदरात भूखंड पदरात पाडून घेतल्यानंतर काहींनी पार्किंगसाठी देखील भूखंड मिळवले आहेत. परंतु या भूखंडाचा काही दिवस पार्किंगचा वापर केल्यानंतर त्यावरही शाळा अथवा महाविद्यालयाच्या नव्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्याद्वारे शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवून व्यावसायिक उद्देश साध्य केला जात आहे. पर्यायी स्कूलबस अथवा स्टाफ किंवा विद्यार्थ्यांची वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्यांचा वापर होताना दिसत आहे. अशाच प्रकारातून वाशीतल्या मुख्य रस्त्याव्यतिरिक्त अंतर्गतच्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. तर कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, सीबीडी यासह इतर विभागातही हे चित्र पाहायला मिळत आहे. शाळांच्या बाहेर नो पार्किंगचे फलक लावलेले असतानाही, त्याच ठिकाणी रस्त्यावर स्कूलबस उभ्या केल्या जात आहेत. यामुळे सदर मार्गावर सतत वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडिअमलगतच्या संपूर्ण सर्व्हिस रोडवर अशा स्कूलबस उभ्या केल्या जात आहेत. याकरिता गत काही वर्षात त्याठिकाणची झाडे देखील तोडण्यात आलेली आहेत.
अशा शाळा व्यवस्थापनांना यापूर्वी अनेकदा वाहतूक पोलिसांनी रस्ते मोकळे करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. मैदानात वाहने उभी करण्यासह स्कूलबस रस्त्यावर थांबवून विद्यार्थ्यांना त्यात बसवणे अथवा उतरवणे टाळण्याच्याही सूचना केल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला बगल देत या सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय शाळेलगतच्या मोकळ्या मैदानाऐवजी रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. याचा त्रास परिसरातील रहिवाशांसह सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी दिवस-रात्र रस्त्याच्या दुतर्फा स्कूलबस उभ्या केल्या जात आहेत. यासंदर्भात अनेकांनी पालिकेसह वाहतूक पोलिसांना वारंवार तक्रारी देखील केल्या आहेत. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी वाशी वाहतूक पोलिसांनी परिसरातील शाळा व्यवस्थापनाची बैठक घेवून त्यांना स्कूलबस रस्त्यावर न थांबवण्याच्या सूचना केलेल्या. शिवाय शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी वाहतूककोंडी होणार नाही याचीही खबरदारी घेण्याचेही सुचवले होते. त्यानंतरही शाळा व्यवस्थापनांकडून वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून रस्ते बळकावले आहेत.
>विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूलबस ह्या शाळेच्या आवारातच उभ्या केल्या जाव्यात असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यानंतरही रात्रीच्या वेळी ही वाहने शाळेसमोरील रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे एखाद्या समाजकंटकाकडून रस्त्यालगतच्या उभ्या स्कूलबसमध्ये घातक पदार्थ अथवा वस्तू ठेवणे, ब्रेकसोबत छेडछाड करणे असे प्रकार होवू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असतानाही शाळा व्यवस्थापनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Roadside to school bus parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.