नवी मुंबई ते जेएनपीटीदरम्यान अवजड वाहनांचे रस्त्यावरच ठाण; ट्रेलरसाठी वाहनतळ नाही

By नामदेव मोरे | Published: January 8, 2024 06:55 AM2024-01-08T06:55:58+5:302024-01-08T06:56:28+5:30

ट्रक टर्मिनलच्या जागेवर निवासी प्रकल्प

Roadside station for heavy vehicles between Navi Mumbai and JNPT; No parking for trailers | नवी मुंबई ते जेएनपीटीदरम्यान अवजड वाहनांचे रस्त्यावरच ठाण; ट्रेलरसाठी वाहनतळ नाही

नवी मुंबई ते जेएनपीटीदरम्यान अवजड वाहनांचे रस्त्यावरच ठाण; ट्रेलरसाठी वाहनतळ नाही

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पनवेल, उरण, नवी मुंबई परिसरामध्ये ७६ हजारांपेक्षा जास्त अवजड वाहने आहेत. एमआयडीसी, एपीएमसी व जेएनपीटीमध्ये देशभरातून प्रतिदिन १० हजारांपेक्षा जास्त अवजड वाहने येतात. या वाहनांसाठी सद्य:स्थितीमध्ये एकही सुसज्ज टर्मिनल नाही. बाजार समितीमधील ट्रक टर्मिनलच्या जागेवर निवासी प्रकल्प सुरू आहे. यामुळे सर्व अवजड वाहने रोडवर उभी करावी लागत आहेत.

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये अवजड वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीमध्ये स्कूल बस, ट्रक, टँकर, ट्रेलर यांची संख्या ७६,३८२ एवढी आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, ठाणे बेलापूर, औद्योगिक वसाहत व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे मोठ्या प्रमाणात ट्रेलर व ट्रकमधून मालाची वाहतूक सुरू असते. नवी मुंबई, पनवेल ते जेएनपीटीदरम्यान ट्रेलर उभे करण्यासाठी एकही टर्मिनल तयार केलेले नाही. यामुळे ट्रेलरचालकांना जागा मिळेल तेथे वाहने उभी करावी लागतात. अनेक वेळा ट्रेलर पुढे, मागे घेताना अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. रोडवर वाहने उभी केल्यामुळे वाहतूक कोंडीही होत आहे. देशभरातून ट्रेलर नवी मुंबईमध्ये येत आहेत. या वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रोडवर वाहने उभी केल्यामुळे लुटमारीला सामोरे जावे लागत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये रोज पाच हजारांपेक्षा जास्त ट्रक येत असतात. पंजाब, हरयाणा ते मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातसह दक्षिणेकडील राज्यांमधूनही कृषी माल घेऊन ट्रकचालक नवी मुंबईत येतात. पूर्वी बाजार समितीजवळ सिडकोने ट्रक टर्मिनल तयार केले होते. या ट्रक टर्मिनलच्या जागेवर आता निवासी प्रकल्प तयार केला आहे. अवजड वाहनांसाठी एसटी महामंडळाच्या भूखंडावर तात्पुरती सोय केली आहे; पण ती अपुरी असल्यामुळे रोडवरच वाहने उभी करावी लागत आहेत. एमआयडीसीमध्येही रोडवर वाहने उभी करावी लागत आहेत.

बाजार समितीच्या पाच मार्केटच्या बाहेर रोडवर अवजड वाहने उभी करावी लागत आहेत. ट्रक टर्मिनलच्या जागेवर निवासी प्रकल्प सुरू असल्यामुळे पार्किंगचा बोजवारा उडाला आहे.
- अशोक वाळुंज, कार्याध्यक्ष, रॉरी टेम्पो ओनर्स असाेसिएशन

जेएनपीटी रोडवर अवजड वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नाही. ट्रेलरसह अवजड वाहनांसाठी स्वतंत्र टर्मिनलची गरज आहे.
- तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक पोलिस

महापालिकेने सुरू केले सर्वेक्षण

  • देशातील स्वच्छ व राहण्यायोग्य शहर असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या नवी मुंबईमध्ये पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. ३२ वर्षांमध्ये नवी मुंबई महापालिकेला स्वत:चे पार्किंग धोरण तयार करता आलेले नाही. 
  • आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या सोबत पॉलिसी तयार करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. बेलापूरमध्ये पहिला पार्किंग प्लाझा बांधून पूर्ण झाला असून वाशीमध्येही पार्किंग प्लाझा तयार करण्यात येत आहे.

Web Title: Roadside station for heavy vehicles between Navi Mumbai and JNPT; No parking for trailers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.