अवैध पार्किंगचा गोरखधंदा तेजीत, वाहतूक विभागाची ‘अर्थपूर्ण’ चुप्पी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 01:22 AM2020-01-08T01:22:40+5:302020-01-08T01:22:44+5:30
शहरात अवैध पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नवी मुंबई : शहरात अवैध पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: अवजड वाहनांनी आता थेट वसाहतीअंतर्गत रस्त्यावर शिरकाव केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे दळणवळण यंत्रणा कोलमडू लागली आहे. वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. लहान-मोठे अपघात घडत आहेत. या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांच्या अर्थपूर्ण छुप्पीमुळे अवैध पार्किंगचा हा गोरखधंदा तेजीत आल्याचे चित्र सायबर सिटीत पाहावयास मिळत आहे.
मागील दोन दशकांत नवी मुंबई शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. लोकसंख्येच्या वाढीबरोबर येथील उद्योगधंदेही वाढीस लागले, त्यानुसार वाहनांची संख्याही वाढली आहे. शहर उभारताना पार्किंगचे सुयोग्य नियोजन झाले नाही. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. रस्ते अपुरे पडू लागले आहेत. पार्किंगच्या सुविधा नसल्याने वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने उभी करीत आहेत. प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गत अरुंद रस्तेही आता वाहनांच्या पार्किंगला अपुरे पडू लागले आहेत. या रस्त्यांवर दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात आहेत. मागील काही महिन्यांपासून नागरी वसाहतीतील अरुंद रस्त्यांवर अवजड वाहनांचा वावर दिसू लागला आहे. यात ट्रक, टँकर, मोठे ट्रेलर, खासगी बसेस, ट्रॅव्हल्सच्या गाड्या आदीचा समावेश आहे. अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असतानाही नागरी वसाहतीतील रस्त्यांवर या गाड्यांच्या रांगा दिसून येतात. नागरी वसाहतीतील रस्त्यांवर अवजड वाहने पार्क केल्याने त्या परिसरातील दळणवळणाच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. स्कूलबस आणि रुग्णवाहिकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ तुर्भे येथे आहे. या बाजारपेठेत महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून दरदिवशी कृषिमालाची शेकडो वाहने येतात. या वाहनांच्या पार्किंगसाठीसेक्टर १९ येथे विस्तीर्ण ट्रक टर्मिनल बनविण्यात आले आहेत; परंतु आता हे ट्रक टर्मिनलही अपुरे पडू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून एपीएमसी परिसरातील रस्त्यांवर ट्रक पार्क केले जात आहेत. आता तर या अवजड वाहनांनी आजूबाजूच्या नागरी वसाहतीतील रस्त्यांवर आपला विस्तार वाढविला आहे. या परिस्थितीला वेळीच निर्बंध घातले गेले नाहीत, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम शहरवासीयांना भोगावे लागतील, अशी भीती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, तुर्भे नाका येथे अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगच्या विरोधात स्वावलंबी सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बी. वाघमारे यांनी रविवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. संबंधित विभागाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी उपोषण मागे घेतले. असे असेल तरी येत्या काळात अजवड वाहनांच्या पार्र्किंगची समस्या गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
>वाहतूक पोलिसांच्या भूमिकेविषयी संभ्रम
नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून तत्परतेने कारवाई केली जाते. मात्र, त्याच वेळी वसाहतीअंतर्गत अरुंद रस्त्यावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. यात मोठे अर्थकारण असल्याचीही चर्चा आहे. या रॅकेटमध्ये काही दलाल सक्रिय आहेत. त्यांच्यामार्फत वाहनधारकांकडून महिन्याला ठरावीक रक्कम वसूल केली जाते. वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलीस ठाणे, महापालिकेतील संबंधित अधिकारी व स्थानिक पुढाऱ्यांपर्यंत ही रक्कम पोहोचविली जाते. ही रक्कम लाखोंच्या घरात असल्याची माहिती सूत्राने दिली.
>लोकप्रतिनिधींची उदासीनता
मागील २० वर्षांपासून या समस्येकडे सत्ताधाºयांनी दुर्लक्ष केले. लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनानेही या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. याचा परिणाम म्हणून आज या समस्येने आक्राळ स्वरूप धारण केले आहे.