नवी मुंबई : स्वस्तात डॉलर देतो सांगून फसवणूक करणाऱ्या टोळीला सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेगारांनी ज्या व्यक्तीला गंडवण्यासाठी फोन केला होता, त्या व्यक्तीची वर्षभरापूर्वीच अशा प्रकारे फसवणूक झालेली होती. यामुळे जाळ्यात अडकण्याऐवजी त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांच्या मदतीने सापळा रचून तिघांना अटक केली.
कोपर खैरणे परिसरात राहणाऱ्या मयूर मंगे (४२) यांच्या प्रसंगावधानामुळे ही टोळी सानपाडा पोलिसांच्या जाळ्यात अडकली. मंगे यांना वर्षभरापूर्वी स्वस्तात डॉलर देण्याच्या बहाण्याने काहींनी फसवले होते. अशातच पुन्हा त्यांना स्वस्तात डॉलर देण्याच्या बहाण्याने गळाला लावणारा फोन आला. एका व्यक्तीने त्यांना फोन करून तो आंबा विक्रेता असल्याचे सांगून त्याच्याकडे अमेरिकन डॉलर असल्याचे सांगितले. हे डॉलर स्वस्तात देतो असे त्याने सांगताच आपली फसवणूक होत असल्याचे मयूर मंगे यांच्या लक्षात आले. मात्र यावेळी आपण जाळ्यात न अडकता त्यांनाच पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी त्यांनी केली होती. त्यामुळे रविवारी रात्री डॉलर घेण्यासाठी त्यांना सानपाडा पुलालगत बोलवण्यात आले होते. यावेळी गुन्हेगारांनी दिलेल्या वेळेच्या अगोदर मंगे यांनी सानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार पन्हाळे यांनी उपनिरीक्षक अमोल मुंडे, अजय कदम, हवालदार श्रीकांत नार्वेकर, सुनील चव्हाण, संदीप पवार, दत्त जाधव आदींचे पथक केले होते. त्यानुसार गुन्हेगारांनी मयूर यांना रात्री ८ च्या सुमारास सेक्टर ५ येथे बोलवले असता त्याठिकाणी पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. मोफाजुल शेख (४०), मेहबूब शेख (३३) व मासुद गणी (३३) अशी त्यांची नावे आहेत. तिघेही कळंबोली सर्कल परिसरात राहणारे आहेत. तर लांबून पाळत ठेवणारा त्यांचा चौथा साथीदार पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्यांकडून दोन अमेरिकन डॉलर व त्याखाली जोडलेला कागदाचा बंडल जप्त करण्यात आला आहे. स्वस्तात डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारी टोळी पहिल्यांदाच अशा प्रकारे पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.