नेरुळमधील तेरणा विद्यालयाकडून पालक वर्गाची लूट
By Admin | Published: June 28, 2017 03:34 AM2017-06-28T03:34:46+5:302017-06-28T03:34:46+5:30
नेरुळमधील तेरणा विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली आहे. २२८० रुपयांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नेरुळमधील तेरणा विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली आहे. २२८० रुपयांचे साहित्य खरेदी करणाऱ्या पालकांना गणेश बुक स्टोअर्स दुकानाची १०९९ व तेरणा विद्यालयाची संगणक फीसाठी ११८१ रुपयांची पावती देण्यात आली आहे. पालकांची अक्षरश: लुबाडणूक करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने याप्रकरणी हस्तक्षेप करून पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली जात आहे.
नवी मुंबईमध्ये सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या फीमध्ये शिक्षण देणाऱ्या मोजक्या शिक्षण संस्थांमध्ये नेरुळमधील तेरणा विद्यालयाचा समावेश होत होता. माथाडी वसाहत, नेरुळ, कुकशेत व सारसोळे गाव व सर्वसामान्य नागरिकांच्या वस्तीमध्ये ही शाळा आहे. कमी फी व चांगले शिक्षण यामुळे शाळेत प्रवेशासाठी पालकांची प्रथम पसंती मिळू लागली होती; पण काही वर्षांपासून भरमसाठ फी वाढविण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करण्यात आली. पालकांचा विरोध डावलून जादा किमतीमध्ये साहित्य खरेदी करावी लागली होती. राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेनेने आंदोलन केल्यानंतरही एक रुपया फीही कमी करण्यात आली नाही. यावर्षीही शाळा व्यवस्थापनाने २२८० रुपयांचे साहित्यखरेदी करण्याची सक्ती केली आहे. वर्गनिहाय ही रक्कम वेगवेगळी आहे. पालकांकडे यापूर्वीच ज्या वस्तू आहेत, त्याही पुन्हा खरेदी करण्यास भाग पाडले आहे.
व्यवस्थापनाच्या सक्तीमुळे पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदी केले आहे. साहित्य खरेदी केल्यानंतर प्रत्येक वस्तूची किंमत असलेली पावती सर्वांना देणे आवश्यक असते; परंतु व्यवस्थापनाने गणेश बुक स्टोअर्सच्या नावाने १०९९ रुपयांची पावती दिली आहे. या पावतीमध्ये संबंधित बुक स्टोअर्सचा पत्ता, संपर्क नंबरचा उल्लेखही केलेला नाही. तेरणा विद्यालयाच्या नावाने ११८१ रुपयांची पावती दिली. पावतीमध्ये संगणक फीचा उल्लेख केला आहे; परंतु कोणते शिक्षण दिले जाणार आहे, याचा तपशील दिलेला नाही. व्यवस्थापनाच्या पिळवणुकीविरोधात कोणाकडे आवाज उठवायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.