रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द; स्थानिकांच्या आंदोलनामुळे निर्णय, पर्यायी गाडीची केली व्यवस्था
By कमलाकर कांबळे | Published: September 7, 2022 06:40 PM2022-09-07T18:40:39+5:302022-09-07T18:42:33+5:30
स्थानिकांच्या आंदोलनामुळे रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
नवी मुंबई : रोहा येथील रहिवाशांनी केलेल्या जनआंदोलनामुळे गणपतीसाठी विशेष सुरू करण्यात आलेली रोहा चिपळूण रोहा ही मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार रोहा ते चिपळूण आणि चिपळूण ते रोहा या दोन्ही मार्गावरील मेमूच्या विशेष फेऱ्या ७ ते १२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले तरी प्रवाशांची गैरसोय होवू नये या उद्देशाने चिपळूण - पनवेल - चिपळूण ही विशेष मेमू सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने विविध मार्गावर यंदा अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. तसेच ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी आहे, त्या मार्गावर काही अतिरिक्त गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गतच रोहा-चिपळूण-रोहा ही विशेष मेमू सुरू करण्यात आली होती. परंतु रोहा येथे स्थानिकांनी आंदोलन पुकारल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव ही विशेष मेमू सेवा १२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. मात्र त्याचवेळी चिपळूण येथून पनवेलला येणाऱ्या आणि इथून चिपळूणला जाणाऱ्या प्रवाशांची या काळात गैरसोय होवू नये, यादृष्टीने ७ ते १२ सप्टेंबर या दरम्यान चिपळूण-पनवेल-चिपळूण ही विशेष मेमू सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मेमूला आगाउ आरक्षण नसणार आहे. ही गाडी खेड, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकावर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.