रोह्यात महिलांनी मारला डल्ला
By admin | Published: March 31, 2017 06:27 AM2017-03-31T06:27:15+5:302017-03-31T06:27:15+5:30
शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या सोन्या-चांदीच्या दुकानात सोनेखरेदी करण्यास आलेल्या एका महिलेजवळील बॅगेतील
रोहा : शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या सोन्या-चांदीच्या दुकानात सोनेखरेदी करण्यास आलेल्या एका महिलेजवळील बॅगेतील दोन लाख रुपये रक्कम त्याच दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोन अनोळखी महिला व मुलींनी हातोहात लंपास करून घटनास्थळावरून पोबारा केला. ही धक्कादायक घटना भरदिवसा रोहे शहरात घडली आहे. ज्वेलर्सच्या दुकानात ‘हात की सफाई, करणाऱ्या दोन महिला व दोन अनोळखी लहान मुली ज्वेलर्स मालकाच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाल्या असल्या तरी त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
रोहा शहरातील एल.जी. कॉम्प्लेक्स या गजबजलेल्या मार्केटमधील मयूरा ज्वेलर्स या दुकानात तालुक्यातील जामगाव येथील रीना राजेंद्र म्हशेळकर (२४) सोने खरेदी करण्यास आल्या होत्या. सोनेखरेदीसाठी आणलेले दोन लाख रुपये त्यांच्या बॅगमध्ये ठेवले होते. यादरम्यान या ज्वेलर्सच्या दुकानात दोन अनोळखी महिला व मुलीही सोने खरेदीकरिता आल्या होत्या. महिलेने आपल्याकडील दोन लाखांची रोकड असलेली पिशवी बाजूला ठेवली असता, ती पिशवी दुकानात अनोळखी महिलांबरोबर आलेल्या लहान मुलीने बघितली व पिशवीत रोख रक्कम असल्याची माहिती सोबतच्या महिलांना दिली. क्षणाचा विलंब न करता दोन लाखांची रोकड बघून महिला-मुलींच्या या चौकडीने डल्ला मारून रोकड लंपास केली.
काही क्षणातच आपल्याजवळील दोन लाखांची रोकड लंपास झाल्याचे समजताच या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. या चोरट्या महिलांविरोधात गुन्हा दाखल आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद
चोरीचा घडलेला सारा प्रकार ज्वेलर्स मालकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या महिला अष्टमीला आल्यानंतर रेल्वेमार्गाने पसार झाल्या. म्हशेळकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पो.नि. नीशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.