नामदेव मोरे।नवी मुंबई : ९ आॅगस्टला मुंबईमध्ये निघणा-या मराठा क्रांती मोर्चामध्ये माथाडी कामगारांची भूमिका निर्णायक राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी १९८२ मध्ये बलिदान दिले होते. त्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामगार एकवटू लागला आहे. मोर्चाच्या तयारीपासून तो यशस्वी करण्यासाठी हजारो कामगार सहकुटुंब परिश्रम घेत आहेत. एपीएमसीसह सर्व बाजारपेठा बंद करून कामगार मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये लाखोंचा मूक मोर्चा काढल्यानंतर क्रांतिदिनादिवशी ९ आॅगस्टला मुंबईमध्ये निर्णायक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील मराठा समाज व समाजाच्या संघटना मोर्चाच्या नियोजनासाठी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. राज्याच्या कानाकोपºयातून मुंबईत येणाºया लाखो समाजबांधवांनी गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. मोर्चाची तयारी व तो यशस्वी करण्यासाठी माथाडी कामगारांची भूमिका निर्णायक राहणार आहे. मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील दोन लाख माथाडी कामगार व त्यांचे नातेवाईक कुटुंबीयांसह मोर्चात सहभागी होत असून घरोघरी जाऊन याविषयी जनजागृती सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाची चळवळ सुरू केली ती माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी. ८० च्या दशकामध्ये राज्याच्या कानाकोपºयातील समाजाला एकत्र आणले. २२ मार्च १९८२ रोजी आरक्षणासाठी विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. आरक्षणाचा निर्णय जाहीर झाला नाही तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही असा इशारा अण्णासाहेबांनी सरकारला दिला होता. सरकारने शब्द पाळला नाही, पण माथाडीच्या या नेत्याने स्वत:वर गोळी झाडून घेऊन दुसºया दिवशी जीवनयात्रा संपविली. अण्णासाहेबांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, असे आवाहन कामगार करत असून त्या आवाहनाला कामगारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांनी सर्व कामगारांनी कुटुंबासह मोर्चामध्ये सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले आहे. नवी मुंबईमधील मराठा समाजाशी समन्वय साधून नियोजन करण्यामध्ये पाटील यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. राज्यातील मराठा समाज मुंबईमध्ये धडकणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून येणारे लाखो मराठा समाजबांधव नवी मुंबईमध्ये उतरणार आहे. त्यांची खासगी वाहने येथे उभी करून रेल्वेने मुंबईमध्ये जाणार आहेत. या कामगारांसाठी वाहनतळ उपलब्ध करून देणे. पाणी, प्रसाधनगृह व इतर सुविधा मिळवून देण्यासाठी सिडकोसह महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मुंबई बाजार समितीचे कामकाज बंद ठेवून तेथेही वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अण्णासाहेबांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही1मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ८० च्या दशकामध्ये माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी राज्यभर चळवळ उभी केली होती. मराठा महासंघाच्या माध्यमातून आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे यासाठी मोर्चे व आंदोलने करण्यात आली.2२२ मार्च १९८२ मध्ये आरक्षणासाठी विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांची भेटघेण्यात आली. सभागृहामध्ये आरक्षणाची घोषणा करा, असे आवाहन त्यांना केले.3आरक्षणाचा प्रश्न आज सुटला नाही तर उद्याचा सूर्य पाहणार नाही असा इशारा अण्णासाहेबांनी दिला. सरकारने शब्द पाळला नाही, परंतु अण्णासाहेब त्यांच्या शब्दावर ठाम राहिले. २३ मार्चला स्वत:वर गोळी मारून घेऊन समाजासाठी प्राणाची आहुती दिली. 4राज्यातील कामगारांसाठी तो काळा दिवस ठरला. यानंतरही कामगारांनी चळवळ सुरूच ठेवली होती. २०१३ ला आझाद मैदानामध्ये मोर्चा काढण्यात आला. अण्णासाहेबांनी केलेल्या त्यागाच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
मराठा क्रांती मोर्चामध्ये माथाडींची भूमिका निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:58 AM