पनवेलच्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 02:27 AM2019-03-25T02:27:31+5:302019-03-25T02:27:44+5:30

लोकसभा निवडणुकीतील मावळ मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मात्र, यात पनवेल, उरणमधील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

The role of Panvel voters will be crucial | पनवेलच्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार

पनवेलच्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार

Next

- वैभव गायकर 

पनवेल : लोकसभा निवडणुकीतील मावळ मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मात्र, यात पनवेल, उरणमधील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पनवेल विधानसभेवर भाजपा तर उरण विधानसभेवर सेनेचा आमदार असल्याने आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना कसरत करावी लागणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून बारणे यांनी पनवेल, उरण मतदार संघात जनसपंर्क ठेवल्याने येथील मतदारांना बारणे नवखे नाहीत. मात्र, थेट लोकसभेची उमेदवारी प्राप्त झाल्यानंतर राजकारणात उडी घेतलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मतदारांना नवखे आहेत.
सर्वात मोठा मतदार संघ असलेल्या पनवेल महापालिकेवर सध्या भाजपाची एकहाती सत्ता आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे केवळ दोन नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीसोबत आघाडी केलेला शेकाप दुसऱ्या क्र मांकाचा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला शेकापवर अवलंबून राहावे लागणार आहे. पनवेल विधानसभा क्षेत्रात एकूण साडेपाच लाख मतदार आहेत, तर उरण विधानसभा क्षेत्रात तीन लाखांच्या आसपास मतदार आहेत. दोन्ही विधानसभा क्षेत्रातील मतदारांची संख्या जवळपास साडेआठ लाखांपर्यंत आहे. दोन्ही मतदार संघात युतीचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान आहे. या मतदार संघाला लागून असलेल्या कर्जत विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे आमदार असल्याने राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे. मात्र, पनवेल, उरण या दोन मतदार संघात आघाडी घेण्यासाठी राष्ट्रवादीचा कस लागणार आहे.
पनवेल मतदार संघात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे वर्चस्व आहे. युती झाल्याने श्रीरंग बारणेंना विजयी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मावळ मतदार संघातील घाटमाथ्यावरील पिंपरी, चिंचवड व मावळ मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे वर्चस्व आहे. मात्र, त्या तुलनेने पनवेल, उरण मतदार संघात असे जाणवत नाही. युतीचे उमेदवार बारणे यांना पाच वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर पार्थ पवार नवखे असले तरी राज्यातील प्रमुख राजकीय घराण्याचा वारसा त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मावळमधील प्रमुख पक्षांच्या दोन्ही उमेदवारांचा निवडणुकीत कस लागणार आहे.

२२ लाख लोेकसंख्या
मावळ लोकसभा मतदार संघ हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदार संघ आहे. राज्यात ठाणे लोकसभा मतदार संघ सर्वात मोठा आहे. या मतदार संघाची संख्या २३ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यापाठोपाठ मावळ लोकसभा मतदार संघ राज्यातील दुसरा सर्वात मोठा मतदार संघ आहे. या मतदार संघात मतदारांची संख्या २२ लाखांपेक्षा जास्त आहे.

Web Title: The role of Panvel voters will be crucial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल