- प्राची सोनवणे
नवी मुंबई : पुणेमध्ये अॅथलेटिक्स फेडरेशनच्यावतीने आयोजित स्पर्धेमध्ये नवी मुंबईमधील रोसलीन लेवीसने दोन सुवर्णपदके मिळविली. पाच वर्षांपूर्वी सुरू झालेला यशाचा प्रवास तुर्कीमधील जागतिक शालेय स्पर्धांमध्येही कायम राहिला. या स्पर्धेमध्ये मिळालेल्या रौप्य पदकाने तिच्यामध्ये आॅलिम्पिकमध्ये यश मिळविण्याची जिद्द निर्माण झाली असून त्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.अॅथलेटिक्समधील स्प्रींटिग प्रकारामध्ये नवी मुंबईच्या रोसलीन लेवीसने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणाºया वाशीच्या फादर अॅग्नेल स्कूलमध्ये १२ वीमध्ये शिक्षण घेत आहे. क्रीडा स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाºया या खेळाडूने दहावीमध्ये ९२ टक्के गुण मिळविले होते. बारावीमध्येही चांगले गुण मिळविण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले असताना धावण्याच्या सरावामध्येही एक दिवसाचाही खंड पडू दिला जात नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ स्पोर्टमधील प्रशिक्षक श्रीनिवास गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षांपासून ती कसून सराव करत आहे. रोज तीन तास न चुकता धावण्याचा सराव सुरू आहे. २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न तिने पाहिले आहे.देशासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यामध्ये कुठेही कसूर राहणार नाही यासाठी ती स्वत:, आई-वडील व प्रशिक्षक सदैव दक्ष आहेत. तिच्या आतापर्यंतच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप टाकला की तिने पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येईल असा विश्वास सर्वांना वाटू लागला आहे. २०११ - १२ मध्ये पुणे येथे अॅथलेटिक फेडरेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटामध्ये १०० मीटर स्प्रींटिगमध्ये तीन सुवर्णपदके मिळविलीच याशिवाय उंच उडीमध्येही सुवर्णपदकाला गवसणी घातली. तेव्हापासून सुरू झालेला यशाचा आलेख सदैव उंचावत राहिला आहे. तुर्कीमध्ये झालेल्या जागतिक शालेय स्पर्धेमध्ये तिने रौप्य पदक मिळविल्यामुळे पूर्ण देशवासीयांना तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये रोसलीनने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाची दखल शासनाने घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वीच शासनाने तिला शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. प्रत्येक महिन्याला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळू लागली आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेपेक्षा त्यामुळे तिच्यामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास व देशासाठीजागतिक स्पर्धांमध्ये यश मिळविण्यासाठी निर्माण झालेली जिद्द महत्त्वाची आहे.अॅथलेटिक्समध्ये यश मिळविणाºया या खेळाडूचे वडील खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असून आई शिक्षिका आहे. तिच्या यशाचे आई - वडील दोघांनाही प्रचंड कौतुक असून अभ्यास व खेळ दोन्हींचा योग्य समन्वय साधण्यातही तिने यश मिळविले असल्याची प्रतिक्रिया वडिलांनी दिली आहे.मिशन २०२०आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीनिवास गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली रोसलीनचा सराव सुरू आहे. त्यांनी तिच्यामधील गुणवत्तेविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सात वर्षांपासून ती कसून सराव करत आहे. तिची प्रगती पाहून आम्हालाही अभिमान वाटत आहे. २०२० मध्ये टोकियोमध्ये होणाºया आॅलिम्पिकमध्ये निवड होण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. तिने सुवर्णपदक मिळवून नवी मुंबईचे व देशाचे नावही रोषण करावे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.