‘रोटा व्हायरस’चा नियमित लसीकरणात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:20 AM2019-08-03T01:20:49+5:302019-08-03T01:21:07+5:30
महापालिका राबविणार अभियान : २२ हजार बालकांना देणार लस
नवी मुंबई : अतिसारामुळे होणारे बालकांचे कुपोषण टाळणे व अर्भक मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरण सुरु केले आहे. नवी मुंबईमध्येही हे अभियान प्रभावीपणे राबविले जाणार असून २२ हजार बालकांना लस दिली जाणार आहे.
शिरवणे नागरी आरोग्य केंद्रामध्ये महापौर जयवंत सुतार, आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये लसीकरण अभियान सुरू करण्यात आले. पूर्वी रोटा व्हायरस लस खाजगी वैद्यकीय आरोग्य केंद्रात देण्यात येत होती. मात्र त्यासाठी खर्च मोठया प्रमाणावर येत असल्याने आता ती पालिकेची सर्व रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत दिली जाणार आहे. रोटा व्हायरसमुळे होणारा धोका लक्षात घेऊन ही लस बालकांना सहा आठवडे, दहा आठवडे, चौदा आठवडे अशी तीन वेळा देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर जयवंत सुतार व आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.