नवी मुंबई : फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नवी मुंबई लेबर युनियनच्या माध्यमातून बुधवारी महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. फेरीवाल्यांच्या व्यवसायाला कायदेशीर संरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांसह आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले.
महापालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाला हरताळ फासले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला सोयीस्कररीत्या फाटा दिला जात असल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांनी केला आहे. फेरीवाल्यांवर वाटेल तेव्हा कारवाई केली जाते. स्वच्छता अभियानासाठी शहरातील फेरीवाल्यांना वेठीस धरण्यात आले. या काळात त्यांच्या व्यवसायावर गदा आणली गेली. ही कृती निंदनीय असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे. तुर्भे येथे मागील चार दिवसांपासून फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. फेरीवाला धोरण राबवून त्यांना व्यवसायासाठी हक्काच्या जागा दिल्यात तर ही वेळच येणार नाही. मात्र, प्रशासन जाणिवपूर्वक फेरीवाल्यांशी खेळत असल्याचा आरोपही म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
दरम्यान, तुर्भे जनता मार्केटमध्ये व्यापाºयांनी बळकावलेल्या जागा मोकळ्या करून त्या जुन्या व नव्याने परवानाधारक फेरीवाल्यांना प्राधान्य द्यावे, आपल्या टपºया व इतर व्यवसाय भाडेतत्त्वावर देणाºयांवर कारवाई करावी, तसेच बायोमेट्रिक सर्व्हे रद्द करून नव्याने सर्व्हे करावा आदी मागण्यांचे निवेदन या वेळी वाशी विभाग अधिकाºयांना देण्यात आले आहे. या वेळी प्रफुल्ल म्हात्रे यांच्यासह युनियनचे उपाध्यक्ष हरीभाऊ म्हात्रे, शत्रुघ्न पाटील, अनवर शेख, यमुना यादव, केराबाई नागरगोजे आदीसह फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.