तथाकथित स्वराज क्रेशर स्टोन एलएलपी खाण घोटाळाप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 07:18 PM2023-06-03T19:18:01+5:302023-06-03T19:18:24+5:30
एनसीपीच्या विरोधात श्री कान्होबा दगडखाण व क्रशर चालक मालक संघटनेनेही दंड थोपटले
मधुकर ठाकूर, उरण: नवी मुंबईतील स्वराज क्रेशर स्टोन एलएलपी खाण घोटाळा कर्नाटकच्या खाण घोटाळ्यापेक्षा गंभीर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पत्रकार परिषदेत घेऊन केल्यानंतर स्वराज क्रेशर स्टोनच्या मदतीला श्री कान्होबा दगडखाण व क्रशर चालक मालक संघटना धावली आहे.शुक्रवारी (२) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्वराज क्रेशर स्टोन एलएलपी खाण प्रकरणात कोणत्याही प्रकारचा घोटाळा नसल्याचा दावा करत एनसीपीचे प्रशांत पाटील आणि कांतीलाल कडू यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
नवी मुंबई पनवेल, उरण महसूल क्षेत्रातील बेकायदा दगड खाणी, खनिजकर्म वसूली आणि स्वराज केशर स्टोन एलएलपी कंपनीने शासनाच्या परवानगी शिवाय दर ठरवून एकाधिकारशाही सुरु केली आहे.भाजपचे गिरीश महाजन, श्रीकांत शिंदे,दादा भुसे आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वराज स्टोन एलएलपी कंपनीने राजकीय बळाचा वापर करून क्रशर स्टोन चालक मालकांना २५ लाख रुपयांचे आमिष दाखवून दगड,ग्रीट,खडी स्वराज्यलाच विकण्याची सक्ती केली जात आहे.क्रेशर मालक दगड खाण चालक मालक यांच्यावर होत असलेला अन्याय आणि महसूल यंत्रणेला हाताशी धरून राज्य मंत्री मंडळातील काही सदस्य तसेच त्यांचे नातेवाईक व्यवसायावर टाच आणत आहेत.यामुळे दगड, ग्रीट, खडीचे भाव दुप्पटीने वाढले आहेत.
स्वराज क्रेशर स्टोन एलएलपी कंपनीच्या सक्तीमुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांवर अन्याय होत असुन यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे.या तथाकथित घोटाळ्याची निवृत्त न्यायाधिशांच्या त्रिसदस्यीय कमिटी किंवा राज्याच्या लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रशांत पाटील, कांतीलाल कडू, नंदराज मुंगाजी, सचिन केणी यांनी केली पत्रकार परिषदेतून केली होती.
पत्रकार परिषदेत झालेल्या गंभीर आरोपानंतर स्वराज क्रेशर स्टोनच्या मदतीला श्री कान्होबा दगडखाण व क्रशर चालक मालक संघटना धावली आहे.शुक्रवारी (२) रोजी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्वराज क्रेशर स्टोन एलएलपी खाण प्रकरणात कोणत्याही प्रकारचा घोटाळा नसल्याचा दावा करत एनसीपीचे प्रशांत पाटील आणि कांतीलाल कडू यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत केलेले आरोप दगडखाण व क्रशर चालक मालक संघटनेने फेटाळून लावले आहेत. प्रशांत पाटील यांचा याप्रकरणा मागील अंतस्थ हेतू वेगळाच असुन याप्रकरणी लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन खुलासा करण्यात येणार असल्याची माहिती श्री कान्होबा दगडखाण व क्रशर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुनील भोईर, सचिव अतुल भगत यांनी पत्रकार परिषदेतून दिली.याप्रसंगी श्री कान्होबा दगडखाण व क्रशर चालक मालक संघटनेचे अन्य पदाधिकारी व सुमारे ४०-४५ सदस्यही उपस्थित होते.
आतापर्यंत रॉयल्टीपोटी २५ कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे.यापुढेही रॉयल्टीमध्ये तिप्पटीने वाढणार असल्याचा दावा श्री कान्होबा दगडखाण व क्रशर चालक मालक संघटनेने केला आहे.मात्र पर्यावरण,१०० ब्रासची रॉयल्टी भरुन हजारो ब्रासच्या मालाची अधिकाऱ्यांना हाताशी धरून होणारी विक्री , वनीकरण आदी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना संबंधितांनी समाधानकारक उत्तर न देता बगल दिली.येत्या काही दिवसात याप्रकरणी आणखी राजकीय आरोप -प्रत्यारोप होण्याची शक्यता अधिक दिसते.