कळंबोली : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत राजकीय पक्षांकडून राज्य निवडणूक आयोगाला वारंवार निवेदने दिली जात आहेत. निवडणूक लांबणीवर न टाकता लवकर घ्यावी, या शेतकरी कामगार पक्षाच्या मागणीवर भारतीय जनता पक्षाने गुरुवारी निवेदन देऊन कुरघोडी केली आहे. मतदार याद्यातील घोळ, उन्हाचा कहर आणि सुट्याचे कारण पुढे करीत शिष्टमंडळाने जून महिन्यात निवडणूक घेण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त जी. एस. सहारिया यांच्याकडे केली. त्याचबरोबर पनवेल महापालिका संघर्ष समितीनेही निवेदन सादर करीत, सुधाकर शिंदे यांनी बदली रद्द करून निवडणूक लवकरच घेण्याची मागणी केली.पनवेल महापालिकेच्या प्रशासकाची सहा महिन्यांची मुदत शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे त्या कालावधीत निवडणूक घेणे आवश्यक होते; परंतु अनेक कारणामुळे निवडणूक तारखा जाहीर करता आल्या नाहीत. एकंदरच स्थिती पाहता एप्रिल महिन्यात निवडणूक घेणे सध्यातरी अशक्य आहे. शेतकरी कामगार पक्षाने महापालिका निवडणुकीत पूर्ण तयारी केलेली आहे. त्यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर आघाडी होऊन उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत. कोकण शिक्षक मतदार संघ, पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील विजयाचे वातावरण काही प्रमाणात असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मात्र, निवडणूक प्रक्रि या लांबणीवर पडल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जी.एस. सहारिया यांची भेट घेऊन लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली. ३० मार्च रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी, आमदार नरेंद्र पवार, महेश बालदी यांच्यासह निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक जून महिन्यात घेण्याची मागणी केली. १५ एप्रिलच्या दरम्यान शाळांना सुट्या लागत आहेत. त्याच कालावधीत लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, उत्सव असल्याने चाकरमानी मूळ गावाला जातात. पनवेल महापालिका हद्दीत महसूल गावांचा अपवाद वगळता बाकी सर्व नागरी वसाहती आहेत. येथे चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक आहे आणि ते निर्णायक भूमिका बजावणारे मतदार आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत विशेष करून सिडको वसाहतीत शुकशुकाट असतो. या कालावधीत निवडणूक घेतली, तर मतांचा टक्का कमालीचा खाली जाईल, कडक उन्हात मतदान घेतले तर त्याचा त्रास मतदारांना होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर मतदान मेअखेर किंवा जून महिन्यात घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली. महापालिका संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सहारिया यांची भेट घेतली. त्यांनी डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली रद्द करावी, २१ दिवसांच्या आत निवडणूक घ्यावी, मतदार खरेदी करणे, गृहसोसायटीला रंगरंगोटी करणे, मतदारांना आकर्षक करून त्यांना लाचार बनविणे, आदी मागण्यांचे निवेदन दिले.रोडपाली- कळंबोली आघाडीचेही पत्ररोडपाली कळंबोली विकास आघाडीच्या वतीने गेल्या महिन्यात आत्माराम पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त जी.एस. सहारिया यांना याबाबत पत्र दिले होते. सुटीच्या अगोदर निवडणूक प्रक्रि या पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आलेली होती. सुटीतील निवडणूक संयुक्तिक ठरणार नसल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. जर उन्हाळ्याच्या सुटीच्या अगोदर मतदान घेता आले नाही, तर मग ही प्रक्रि या लांबणीवर म्हणजे सप्टेंबरला पार पाडावी, अशी विनंती पत्रान्वये सर्वातअगोदर त्यांनी केली होती. भारिप बहुजन महासंघ लढवणार ४० जागा1- कामोठे सेक्टर ३४मधील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष दीपक मोरे यांनी भारिप बहुजन महासंघ पनवेल महानगरपालिकेच्या ४० जागा लढवणार, अशी घोषणा केली आहे. छोट्या समूहांना दडपण्याचा वारंवार प्रयत्न होतो म्हणून सर्व समाजाच्या समूहांना आणि संघटनांना एकत्र करून महाराष्ट्रात लोकशाही आघाडी तयार करण्यात आली असून, सदर आघाडीचे नेतृत्व खासदार बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे करीत आहेत, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागलेले आहेत.2 - अकोला पॅटर्न आणि सोशल इंजिनीअरिंग याची प्रचिती महाराष्ट्राला भारिपने करून दिली आहे. पनवेलच्या आंबेडकर भवनाबाबत पुनर्वसनामध्ये भारिप कार्यकर्त्यांचा सहभाग होता. पारंपरिक पक्षांना तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. कुणालाही उघड वा छुपा पाठिंबा भारिपचा नाही, असे दीपक मोरे यांनी सांगितले आहे. पनवेल महापालिकेत भारिप बहुजन महासंघ किंगमेकर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ३० प्रभागातून महासंघाकडे अर्ज आलेले आहेत. सध्या आघाडीने ५ उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत.
राज्य निवडणूक आयोग निवेदनांच्या फेऱ्यात
By admin | Published: April 01, 2017 6:25 AM