नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीच्या अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जेएनपीटी (बेलपाडा) ते उलवे या दरम्यान १0.१0६ मीटर लांबीचा सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याच्या ५.८ कि.मी. लांबीच्या मार्गासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्याचा एकूण खर्च ७११ कोटी रुपये इतका आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण होईल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. विमानतळाचे काम प्रगतिपथावर असतानाच विमानतळाला जोडणाऱ्या रस्ते वाहतुकीवरही सिडकोने भर दिला आहे. शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान २२ किमी लांबीच्या मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) रोडचे कामाला अलीकडेच सुरुवात करण्यात आली आहे. हा मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी सिडकोने जेएनपीटी-उलवे दरम्यान १0.१0६ किलोमीटर लांबीचा नवीन सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्ग जेएनपीटी (बेलपाडा) येथून सुरू होणार असून पुढे जासई टेकड्यांच्या पायथ्याशी शिवाजीनगर येथील प्रस्तावित एमटीएचएलला जोडला जाणार आहे. येथून हा मार्ग उलवे किनारपट्टीवरून पुढे जाणार आहे. पनवेल खाडीवरील आम्रमार्ग हा या मार्गाचा शेवटचा टप्पा असणार आहे. त्यामुळे जेएनपीटीला जोडणारा दुसरा जोडमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग-४बी आणि राज्य महामार्ग -५४ वरून आम्रमार्गावर येणाºया वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.दोन टप्प्यात हा सागरी मार्ग बांधण्याचे सिडकोने निश्चित केले आहे. पहिला टप्पा आम्रमार्ग जंक्शन ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजीनगर ते जेएनपीटी (बेलपाडा) असा असणार आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा १.२ कि.मी. लांबीचा जोड रस्तादेखील विकसित करण्यात येणार आहे.या मार्गातही तीन खाडीपूल असून एक खाडीपूल १.२ किलोमीटर अंतराचा आहे, तर अन्य दोन खाडीपूल ६६० मीटर लांबीचे आहेत. या मार्गात खारफुटींचा अडथळा आहे. त्यासाठी बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी सिडकोने संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे.दरम्यान, या सागरी मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या आर्थिक निविदा मागविण्यात आल्या आहेत. आॅगस्ट महिन्यात या निविदा उघडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. साधारण आॅक्टोबर २०२१पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार आहे.
जेएनपीटी ते उलवादरम्यान लवकरच सागरी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 4:56 AM