नवी मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी महापालिकेने नेरूळमध्ये उभारलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. कंपोस्ट खत निर्मितीचा फक्त दिखावा सुरू आहे. उद्यानामधील दैनंदिन साफसफाईही व्यवस्थित केली जात नसून येथील पाच मीटर त्रिज्येचे शहरातील पहिले सौर घड्याळही बंद पडले आहे.नवी मुंबईला उद्यानाचे शहर असे स्वरूप प्राप्त झाले आहे. जवळपास २०० छोटी - मोठी उद्याने पालिकेने तयार केली आहेत. परंतु यामधील बहुतांश उद्यानांचा पांढरा हत्ती झाला आहे. योग्यपद्धतीने देखभाल करण्याची यंत्रणाच नसल्याने उद्यानांची दुरवस्था होत असून त्यामध्ये नेरूळ सेक्टर १९ ए मधील आर. आर. पाटील उद्यानाचाही समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते असलेल्या आबांचे नवी मुंबईवर विशेष लक्ष होते. त्यांनी सुरू केलेल्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा पहिल्या वर्षीचा पुरस्कार नवी मुंबईला मिळाला होता. याशिवाय त्यांच्या सहकार्यामुळे मोरबे धरण विकत घेणे पालिकेला शक्य झाले होते. यामुळे नेरूळमधील टेकडीला लागून १२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उद्यान बनवून त्याला आबांचे नाव देण्यात आले. उद्यानामध्ये ८०० मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, योगा पार्क, मुलांसाठी खेळणी, ओपन जीम व ५ मीटर त्रिज्येचे सौर घड्याळ बसविण्यात आले होते.७ नोव्हेंबर २०१५ रोजी उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. अडीच वर्षांमध्ये उद्यानाची दुरवस्था झाली आहे. येथील आकर्षण असलेले सौर घड्याळ बंद पडले आहे. त्याचे आकडे तुटले असून त्याची देखभाल केली जात नाही. उद्यानाची दैनंदिन साफसफाईही केली जात नाही. टेकडीवर एका कोपऱ्यामध्ये कंपोस्ट खत निर्मितीसाठी तारेचे दोन बॉक्स तयार केले आहेत. एक बॉक्स पालापाचोळा टाकून भरला असून तयार खताचा उपयोग केलेला नाही. सद्यस्थितीमध्ये खतामध्ये गवत वाढले आहे. यामुळे पालिकेची उद्यानातील खतनिर्मिती दिखाव्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्यानातील कारंजेही बंद झाले आहेत.
आर.आर.पाटील उद्यानाच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:49 AM