नवी मुंबई : कोरोनाच्या काळात अत्यावश्यक व आरोग्य विषयक खर्च वगळता इतर कोणतेही कामे करू नयेत, अशा अशयाचे परिपत्रक राज्य सरकारने मे महिन्यात जारी केले आहे. परंतु या परिपत्रकाला केराची टोपली दाखवत महापालिकेने विद्युत खांबे बदलण्याच्या कामासाठी तब्बल ३८ कोटी ३३ लाख रूपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटात महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेल्या या उधळपट्टीबाबत शहरातील सुजाण नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या २४ हजारांच्या घरात गेली आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडाही धडकी भरविणारा आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्वोत्परी प्रयत्न केले जात आहेत. कोविडमध्ये शहरवासियांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यादृष्टीने महापालिकेकडून सर्वकष प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे संकट आणखी किती काळ असेल, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे पुढील काही महिने तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परोकोटीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेला मोठ्या निधीची गरज आहे. ही वस्तुस्थिती असताना सध्या कोणतीही गरज नसताना केवळ विद्युत खांबे बदलण्यासाठी महापालिकेच्या संबधित विभागाकडून तब्बल ३८ कोटींच्या निविदा मागविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. एप्रिलपासून जीएसटीचे अनुदानही महापालिकेला मिळालेले नाही. अशा परिस्थितीतही महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत दहा कोटीपेक्षा अधिक खर्च केला आहे. तसेच वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यासाठी आणखी २0 कोटींच्या निधीची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.
सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता आतापासूनच काटकसर केली नाही, तर भविष्यात महापालिकेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारने ४ मे २0२0 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोविड व्यतिरिक्त अत्यावश्यक सुविधांवर एकूण नियोजित खर्चापैकी केवळ ३३ टक्के खर्च करण्याचे सुचित केले आहे. असे असतानाही महापालिकेतील काही अधिकारी आणि ठेकेदार असलेल्या माजी नगरसेवकांनी संगनमत करून विद्युत खांबे बदलण्याच्या नावाखाली ३८ कोटी ३३ लाख रूपयांचा अनावश्यक खर्च करण्याचा घाट घातल्याचा आरोप केला जात आहे. हा संपूर्ण खर्च बेलापूर, नेरूळ, तुर्भे आणि वाशी या चार विभागातील पदपथावरील विद्युत खांबे बदलण्यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या प्रकरणी लक्ष घालून विद्युत खांबे बदलण्याच्या अनावश्यक खर्चाला स्थगीती द्यावी, अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे.विद्युत खांब बदलण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा महापालिकेत मी येण्यापूर्वी काढल्या असाव्यात, तरी त्याबाबत चौकशी करून निर्णय घेतला जाईल. - अभिजीत बांगर आयुक्त, नवी मुंबई महापालिका