नवी मुंबई : आरटीओशी संबंधित कामे करण्यासाठी दलालांशी संपर्क साधू नये. पुरेशी कागदपत्रे असलेल्या एकाही नागरिकाची अडवणूक केली जाणार नाही. सर्व कामे वेळेमध्ये करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कार्यालयामध्ये एकखिडकी योजनाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली आहे.नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या दोन दलालांवर दक्षता विभागाने गुन्हे दाखल केले होते. या घटनेनंतर कार्यालयामधील दलाल व खासगी कर्मचाºयांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी कार्यालयातील कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांविषयी माहिती दिली. परिवहन कार्यालयामध्ये नागरिकांना लर्निंग लायसन्स, पक्के लायसन्स, जुन्या वाहनांची मालकी बदलणे, कर्जाची नोंद घेणे, लोनची नोंद काढणे, ना हरकत प्रमाणपत्र मिळविणे आदी कामांसाठी यावे लागते. यापैकी लायसन्सशी संबंधित कामे परिवहनच्या संकेतस्थळाचा वापर करून आॅनलाइन पद्धतीने करायची आहेत. त्यासाठी शुल्कही आॅनलाइन पद्धतीने भरण्याची सोय करण्यात आली आहे. कार्यालयामध्ये कोणत्या कामासाठी कोणत्या खिडकीमध्ये जायचे याविषयी फलक लावण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावरही नकाशे लावण्यात आले आहेत. याशिवाय अनुज्ञाप्ती इतर कामे, वाहनाची कामे, लोनची नोंद घेणे, उतरवणे, पत्ताबदल, मालकीबद्दलचे अर्ज सकाळी साडेदहा ते अडीच या वेळेमध्ये खिडकी क्रमांक १८ मध्ये स्वीकारले जात असल्याची माहितीही डोळे यांनी दिली.आरटीओ कार्यालयामधील स्वीकारलेल्या अर्जांची नोंदवही ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये सेवांची पूर्तता किती दिवसांमध्ये करण्यात येईल याची माहिती देणारे फलक कार्यालयात लावण्यात आलेले आहेत. शिकाऊ अनुज्ञाप्ती किंवा लर्निंग लायसन्स परीक्षा पास झाल्याच्या दिवशी उमेदवाराच्या हातात दिले जात आहे. उमेदवाराचे नाव व मोबाइल क्रमांकाची नोंद करून घेतली जात आहे. कायमस्वरूपी वाहन परवान्याची परीक्षा झाल्यानंतर एक आठवड्याच्या आतमध्ये पोस्ट कार्यालयाकडे पाठविले जात आहे. हा कालावधी दोन दिवसांवर घेऊन येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. वाहन संबंधित कामकाजदेखील एक आठवड्यात पूर्ण करून नोंदणी पुस्तक पोस्ट विभागाकडे दिले जात असल्याची माहितीही परिवहन अधिकाºयांनी दिली.
जलद सेवेसाठी आरटीओत एक खिडकी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 2:07 AM