शिवाजी गोरे ल्ल दापोली पती दोन्ही पायाने अपंग असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पत्नीवर येऊन पडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे व नंतर दापोली असा कष्टमय प्रवास सुरु झाला. दापोलीत राहून मोलकरणीचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना महिला आरक्षणामुळे भोळवली ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून जाण्याची संधी मिळाली. सरपंचपद महिला राखीव पडल्याने मयुरी महेंद्र पाडेकर यांची गावाने बिनविरोध निवड केली आहे. बारा वर्षांपूर्वी अपंग तरुणाशी विवाह करण्याचे धाडस दाखवून मोठ्या हिंमतीने तिने संसाराची सुरुवात केली. पुणे येथे पती -पत्नीला काम मिळाल्यामुळे पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुण्यातील वातावरणात ते फार काळ टिकले नाहीत. पुण्यातील काम सोडावे लागल्यानंतर गावाकडे न जाता दापोली शहरात राहून मोलकरीणीचे काम करुन कुटुंबाचा सांभाळ करण्याचे धाडस तिने दाखविले. दापोलीत राहुनसुद्धा महेंद्र पाडेकर यांनी गावाशी नाळ जुळवून ठेवली होती. त्यामुळे २०१० च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मयुरी पाडेकर बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आल्या. मयुरी ग्रामपंचायत सदस्याच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत दर आठवड्याला गावात जाऊन प्रभागाच्या समस्या सरपंच व ग्रामसेवकाकडे मांडत होत्या. गेल्या पाच वर्षात केलेल्या चांगल्या कामाचे फळ म्हणून २०१५ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा त्या निवडून आल्या. भोळवली ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण महिला राखीव पडल्यामुळे इतर पुरुषांची मक्तेदारी आपोआप संपुष्टात आली. परंतु, सरपंचपदी कोणत्या महिलेची वर्णी लावावी यासाठी गावाने बैठक घेतली. या बैठकीत मयुरी महेंद्र पाडेकर यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय गावाने बहुमताने घेतला. सुशिक्षीत व कष्टाळू सरपंच गावाला मिळाल्याने गावाचा विकास होईल असा विश्वास गावकऱ्यांना वाटतो आहे.
कामवाली बाईच्या हातात गावाची दोरी
By admin | Published: August 18, 2015 12:35 AM