नवी मुंबई : राज्य सरकारने २00८मध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मज्जाव करणारा कायदा आणला; परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने हा कायदा कागदावरच सीमित राहिला आहे. नवी मुंबईत तर धूम्रपान बंदीबाबत असलेले नियम पूर्णत: धाब्यावर बसविल्याचे दिसून येते. कायद्याने धूम्रपान निषिद्ध म्हणून जाहीर केलेल्या ठिकाणांवर सर्रासपणे धूम्रपान केले जात आहे. तर हॉटेल्स व बीअर बारमधील नो स्मोकिंगचे फलक नावापुरते उरले आहेत. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन सरकारने हा कायदा आणला होता. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात अंतर्भूत करण्यात आलेली आहे. तसेच या कायद्यान्वये १८ वर्षांखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे व सेवन करण्यास मनाई आहे. मात्र, प्रभावी अंमलबजावणीअभावी हा कायदा पूर्णत: निष्प्रभ ठरल्याचे दिसून येते. शहरातील सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे सिगारेटचे झुरके मारताना तरुण मंडळी दिसून येतात. यात महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. विशेषत: महाविद्यालयीन अल्पवयीन मुले व मुली धूम्रपानाच्या विळख्यात सापडल्याचे भयावह चित्र आज सायबर सिटीत निर्माण झाले आहे. बस थांबे, रेल्वे स्थानकांच्या परिसरात, शहरातील कॉफी शॉप, ज्युस सेंटर आदी ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या तरुणार्इंचे जथ्थे दिसून येतात. वाशीतील नवरत्न, विश्वज्योत, त्रिमूर्ती, संजोग या हॉटेल्सच्या लगतच्या परिसरात धूम्रपान करणाऱ्यांचा वावर मोठा आहे. त्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्यांना त्याचा कमालीचा त्रास होतो. महत्त्वाचे म्हणजे, या हॉटेल्सच्या मोकळ्या पॅसेजमध्ये नो स्मोकिंगचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, त्याकडे डोळेझाक करीत बेफिकीरपणे सिगारेटचे झुरके मारले जातात. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या या बिनधास्त धूम्रपानाचा फटका परिसरातील इतर नागरिकांना बसत आहे. शाळा-महाविद्यालये व सरकारी कार्यालयापासून १०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र, नवी मुंबई शहरात या नियमालासुद्धा हरताळ फासल्याचे दिसून येते. ‘धूम्रपान बंदी’ कायद्याची अंमलबजावणी कोणी करायची, यासंदर्भात संभ्रम आहे. असे असले तरी अन्न, औषध व प्रशासन विभागानेच प्राथमिक स्तरावर कारवाई करणे अपेक्षित आहे; परंतु गेल्या नऊ वर्षांत नवी मुंबई क्षेत्रात अशा प्रकारची एकही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कोणी कारवाई करावी, याचे स्पष्ट निर्देश या कायद्यात देण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून नियुक्त झालेला पोलीस कर्मचारी, अन्न, औषध आणि प्रशासन विभाग, जिल्हा आरोग्य सोसायटी, मुख्य वैद्यकीय अधिकारी आदींना हे अधिकार बहाल करण्यात आले आहेत; परंतु नवी मुंबईत यापैकी कोणत्याही घटकांकडून धूम्रपान बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अन्न, औषध व प्रशासन विभागाकडून प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे; परंतु नवी मुंबई महापालिकेकडे हा विभागच नाही. अन्न, औषध व प्रशासन विभागाचे कार्यालय ठाणे येथे आहे. त्यांच्याकडील उपलब्ध मनुष्यबळ पाहता या विभागाकडून नवी मुंबईत कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून धूम्रपान बंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंबर कसावी, असे जाणकारांचे मत आहे.पानटपऱ्यांवर अल्पवयीन मुलेनियमाने अल्पवयीन मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व सेवन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे; परंतु शहरातील बहुतांशी पानाच्या ठेल्यावर अल्पवयीन मुले तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना दिसतात, तर अनेक ठिकाणी शालेय मुलेही सिगारेटच्या आहारी गेल्याचे दिसून येते.नो स्मोकिंगच्या फलकांची औपचारिकताकायद्याने ठरवून दिलेल्या आसनक्षमतेपेक्षा कमी आसन क्षमता असलेल्या हॉटेल्समध्ये धूम्रपानास मनाई करण्यात आली आहे; परंतु शहरातील बहुतांशी हॉटेलचालकांनी या नियमाला हरताळ फासला आहे. अनेकांनी नावापुरते नो स्मोकिंगचे फलक लावले आहेत. मात्र, या ठिकाणी सर्रासपणे धूम्रपान केले जाते.
‘धूम्रपान बंदी’चे नियम धाब्यावर
By admin | Published: April 10, 2017 6:15 AM