नवी मुंबई : निवडणूक प्रचारादरम्यान सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. रॅलीत सहभागी झालेले पदाधिकारी हेल्मेटचा वापर करत नाहीत. वाहने कुठेही उभी केली जात असून, नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.नवी मुंबई, पनवेलसह उरण परिसरामध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. वाहतूक पोलीस रोज शेकडो वाहनधारकांवर कारवाई करत आहेत. हेल्मेटचा वापर न करणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे व कार चालकांनी सिटबेल्टचा वापर केला नसला तरी त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात असून त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई केली जात नाही. शहरामध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवाराच्या रॅलींचे आयोजन केले जात आहे. रॅलीसाठी वापरण्यात येणाºया जीपवर क्षमतेपेक्षा जास्त नेते व पदाधिकारी उभे असतात. चालकाने सिटबेल्टचाही वापर केलेला नसतो. रॅलीत सहभागी पदाधिकारी हेल्मेटचा वापर न करता वाहन चालवतात. नो पार्किंगचे बोर्ड असलेल्या ठिकाणीही वाहने उभी केली जात असतानाही संबंधितांवर काहीच कारवाई होत नसल्यामुळे सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सीवूडमधील दक्ष नागरिक किरण ढेबे यांनी याविषयी पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालकांना पत्र देऊन नियम सर्वांसाठी समान असावे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
प्रचार रॅलीमध्ये नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:31 AM