सूर्यकांत वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील हॉटेल्स व्यावसायिकांकडून सर्व नियमांना केराची टोपली दाखवत, पहाटेपर्यंत हॉटेल्स चालवले जात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतानाही त्यावर कारवाईला उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांचीही डोळेझाक होत आहे. एकीकडे सर्वसामान्यांसाठी कायद्यावर बोट ठेवणारे पोलीस प्रशासन नेमके हॉटेल व्यावसायिकांना सूट का देतेय? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला असून तो फसलेला आहे. इच्छुकांना विदेशाप्रमाणे मुंबईत रात्रीचा आनंद लुटता यावा, ही त्यामागची संकल्पना होती; परंतु मुंबईत फसलेली नाइट लाइफ नवी मुंबईत सर्व नियम धाब्यावर बसवून यशस्वीरीत्या सुरू आहे. उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यांच्या मूक संमतीने सर्व नियम धाब्यावर बसवून हॉटेल्स व बार व्यावसायिकांकडून ही नाइट लाइफ चालवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. हॉटेल व बार व्यावसायिकांना संबंधित खात्याकडून रात्रीची वेळ निश्चित करून दिलेली आहे. या वेळेतच हॉटेल्स व बार बंद होणे अपेक्षित आहे. वेळेच्या बंधनामध्ये साध्या हॉटेल्सकरिता रात्री ११ वाजेपर्यंत, आॅर्केस्ट्रा बारसाठी मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत, लेडीस सर्व्हिस बारसाठी रात्री ९.३० वाजेपर्यंत तर परमिट बार अॅण्ड रेस्टॉरंट रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुदत देण्यात आलेली आहे. या वेळेनंतरही हॉटेल्स अथवा बार सुरू राहिल्यास संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, नवी मुंबईत तसे होत नसल्याचे उघड चित्र दिसते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून नियम धाब्यावर बसवले जात असल्याची तीव्र नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वाशी हायवे, कोपरखैरणे, सानपाडा हायवे, नेरुळ, सीबीडी, कामोठे यांसह पनवेलमध्ये अनेक ठिकाणी पहाटेपर्यंत हॉटेल्स व बार सुरू ठेवले जात आहेत. अशा सर्वच ठिकाणी पहाटेपर्यंत ग्राहकांना मद्यपानाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
हॉटेल व बार व्यावसायिकांकडून नियम धाब्यावर
By admin | Published: May 22, 2017 2:25 AM