सोसायटीला अग्निशमन नियमांचे वावडे; महापालिकेच्या नोटिशीला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:12 AM2020-11-29T04:12:38+5:302020-11-29T04:12:51+5:30
कोपरखैरणे सेक्टर १४ येथील भूखंड क्रमांक १७ वर श्री कृष्णा को-ऑप. सोसायटीची खासगी इमारत आहे. या सोसायटीचे १३० सदस्य आहेत.
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील १३० सदनिका असलेल्या एका बड्या गृहनिर्माण सोसायटीने आग प्रतिबंधात्मक नियमांना केराची टोपली दाखविली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून वारंवार सूचना देऊनही संबंधित सोसायटीकडून बंद पडलेली अग्निशमन यंत्रणा दुरुस्त करण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची तक्रार सोसायटीच्या सदस्या रमा गुप्ता यांनी केली आहे.
कोपरखैरणे सेक्टर १४ येथील भूखंड क्रमांक १७ वर श्री कृष्णा को-ऑप. सोसायटीची खासगी इमारत आहे. या सोसायटीचे १३० सदस्य आहेत. विशेष म्हणजे ही इमारत २० वर्षे जुनी असून ती मोडकळीस आली आहे. त्यामुळे १८ नोव्हेंबर २०२० रोजी महापालिकेने सदर इमारत धोकादायक म्हणून घोषित केली असून ती रिकामी करण्याच्या सूचना रहिवाशांना केल्या आहेत. तसेच इमारतीतील अग्निशमन यंत्रणा बंद आहे. त्यामुळे यंत्रणा दुरुस्त करण्याच्या सूचनास अग्निशमन विभागाने सोसायटीला केल्या आहेत. यासंदर्भात १७ सप्टेंबर २०२० रोजी सोसायटीला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार १५ दिवसांत अग्निशमन नियमांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु दोन महिने उलटले तरी सोसायटीकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप रमा गुप्ता यांनी पालिकेला ईमेलद्वारे केला आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा परिस्थितीतसुद्धा सोसायटीत एमजीएलच्या गॅसची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे हे काम रात्रीच्या वेळी सुरू करण्यात आल्याने रमा यांनी संबंधित विभागाकडे याबाबत तक्रार केली.
या तक्रारीच्या आधारे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कारवाई करून गॅसवाहिन्या टाकण्याचे एमजीएलचे काम बंद केले. दरम्यान, ही प्रक्रिया सुरू असतानाच २० नोव्हेंबर रोजी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागण्याची घटना घडली. त्यामुळे येथील रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरल्याचे रमा गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.