नामेदव मोरे, नवी मुंबईस्थायी समितीच्या एका सदस्याची नियुक्ती करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करणारी नवी मुंबई देशातील पहिली पालिका ठरली आहे. सचिवांनी नियम धाब्यावर बसवून एका सभेसाठी एकाच तारखेने तीन विषयपत्रिका तयार करून त्या नगरसेवकांना पाठविल्या आहेत. ही सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, सचिवांना निलंबित करून बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवरून नवी मुंबईतील राजकारण ढवळून निघाले आहे. २००६ नंतर प्रथमच विरोधकांनी सत्ताधारी राष्ट्रवादीला पुन्हा कोंडीत पकडले आहे. राष्ट्रवादी व काँगे्रस आघाडीकडे नऊ व शिवसेना भाजपाचे सात सदस्य असल्यामुळे सभापती पदाची निवड निर्विघ्नपणे होण्याची शक्यता होती. परंतु दिघा येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका अपर्णा गवते यांनी अचानक २ मे रोजी सदस्य पदाचा राजीनामा दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सभापतीपदाची निवडणूक घेण्यासाठीची प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झाली होती. सचिव चित्रा बाविस्कर यांनी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी व वेळ देण्यासाठीचे पत्र कोकण आयुक्तांना दिले होते. कोकण आयुक्तांनी ९ मे रोजी १२ वाजता घेण्याची फॅक्सद्वारे कळविले. यामुळे सत्ताधारी गोटामध्ये पुन्हा अस्वस्थता पसरली. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक जयवंत सुतार, अशोक गुरखे, विनोद म्हात्रे व शुभांगी पाटील यांनी स्थायी समितीच्या एक सदस्याची नियुक्ती करण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी याविषयी २ मे रोजी सचिवांना पत्र देऊन सभा बोलावण्याची मागणी केली.सचिवांनी १० मे रोजी सभा आयोजित करण्यात येत असल्याची विषयपत्रिका तयार करून ती सर्व १११ नगरसेवकांना पाठविली. रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान ही विषयपत्रिका नगरसेवकांना देण्यात आली. परंतु स्थायी समितीसाठी ९ तारीख निश्चित झाल्यामुळे पुन्हा तातडीने दुसरी विषयपत्रिका तयार करण्यात आली. यामध्ये सभेची मागणी करण्यामध्ये शुभांगी पाटील यांच्याऐवजी छाया म्हात्रे यांचा उल्लेख होता. ९ मे रोजी सकाळी १० वाजता सभा घेण्यात येणार असल्याची पत्र सर्व नगरसेवकांना पाठविण्यात आले. विशेष म्हणजे पहिल्यांदा पालिकेची सभा १० मेला वाजता घेण्याचे निश्चित करण्यात आले. महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० मे रोजी आयोजित केली होती. विशेष सभा रद्द करता येत नाही व तिच्या वेळेतही बदल करता येत नाही. परंतु सचिवांनी तत्काळ दुसरी विषयपत्रिका तयार करून ९ मे रोजी सकाळी १० वाजता सभा होणार असल्याचे कळविले. परंतु त्या पत्रिकेवर अगोदरची सभा रद्द झाल्याचा व वेळेत बदल केल्याचा उल्लेख केलेला नव्हता. यामुळे ६ मे रोजी पुन्हा तिसरी विषयपत्रिका तयार करून १० मेची सभा रद्द केल्याचे कळविण्यात आले. > विशेष सर्वसाधारण सभेच्या गोंधळाचा घटनाक्रम २ मे रोजी राष्ट्रवादीच्या अपर्णा गवते यांनी राजीनामा दिला.राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी विशेष सभेची मागणी केली. महापौरांनी विशेष सभा आयोजित करण्याचे पत्र सचिव विभागास दिले.सचिवांनी १० मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली.कोकण आयुक्तांनी ९ मेला सभापती पदासाठीची निवडणूक लावली.राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी पुन्हा ९ मे रोजी सभा घेण्याची मागणी केली.पहिल्या वेळी शुभांगी पाटील यांचे नाव होते, नंतर छाया म्हात्रे यांचे नाव होते.एकाच दिवशी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दोन वेळा पत्र कसे दिले?महापौरांनी २ मेला १० मे रोजी सभेचे आयोजन करण्याचे पत्र दिले.महापौरांनी पुन्हा २ मे याच दिवशी ९ तारखेला सभा घेण्याचे सुचविले.नगरसेवकांना १० मेच्या सभेची नोटीस ५ तारखेला रात्री ९ ते १० वाजता पाठविली.९ तारखेला सभा होणार असल्याची नोटीस ६ तारखेला पहाटे २ ते ५ वाजता पाठविली.१० तारखेची सभा रद्द झाल्याची नोटीस ६ तारखेला दुपारी नगरसेवकांना पाठविली.एकाच सभेच्या तीन नोटीस ५ मे रोजी पाठविण्याचा विक्रम
विशेष महासभेसाठी नियम धाब्यावर
By admin | Published: May 09, 2016 2:32 AM