महापालिकेच्या प्रशासनाशी सत्ताधारी भाजपचे बिनसले?; महापौरांनी सभा केली तहकूब, प्रश्नांना उत्तरे मिळत नसल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 09:36 AM2021-01-21T09:36:35+5:302021-01-21T09:36:39+5:30
सकाळी ११.३० वाजता महासभेला सुरुवात झाली. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर मागील सभेत झालेल्या विषयांवर चर्चेवेळी कोणतीच कारवाई केली गेली नसल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली. सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही पालिका प्रशासन भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.
वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगरपालिकेत सत्ताधारी व प्रशासनात आलबेल नसल्याचे बुधवारी पार पडलेल्या ऑनलाइन महासभेत दिसून आले. विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे मिळत नसल्याने पीठासीन अधिकारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी नाराजी व्यक्त केली. मागील महासभेत पालिकेच्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. याबाबत काय कारवाई करण्यात आली याबाबत प्रशासनामार्फत माहिती मिळाली नसल्याने महापौरांनी १५ मिनिटे महासभेचे कामकाज तहकूब केले होते.
सकाळी ११.३० वाजता महासभेला सुरुवात झाली. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर मागील सभेत झालेल्या विषयांवर चर्चेवेळी कोणतीच कारवाई केली गेली नसल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली. सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही पालिका प्रशासन भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. सभेचे कामकाज सुरू झाल्याच्या अर्ध्या तासातच १२ वाजता सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार सभा तहकूब करण्यात आली. तहकूब सभा सुरू झाल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकाराबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तसेच प्रभाग अधिकारी गायकवाड यांच्याकडून लेखी खुलासा मागितला असल्याचे सभागृहात सांगितले. यापुढे विचारलेल्या प्रश्नांचे लेखी उत्तर देण्याच्या सूचना महापौरांनी केल्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले. मात्र यानंतरही सत्ताधारी नगरसेवकांचे पालिका प्रशासनावर ताशेरे ओढण्याचे काम सुरूच होते. भाजप नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी कोविड काळात करण्यात आलेल्या कारवाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.
मास्क न लावणे, सामाजिक अंतर न पाळणे, प्लॅस्टिक पिशव्या बाळगणे आदी स्वरूपाची कारवाई करताना संबंधित कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. आयुक्तांचे आदेश असताना ५०० दंड वसूल करण्याऐवजी काही कर्मचाऱ्यांनी १०० रुपयांची पावती बनवली. हा प्रकार अनेक वेळा झाला आहे. ही नागरिकांची फसवणूक असून अशा कर्मचाऱ्यांना आयुक्त पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. यावर उत्तर देताना आयुक्त सुधाकर देशमुख यांनी संबंधित प्रकार गंभीर असल्याचे सांगितले. चौकशीत दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. सध्या कंत्राटी पद्धतीने नेमलेले कर्मचारी असा प्रकार करीत आहेत. ते रोजंदारीवर पालिकेत कार्यरत असल्याने जबाबदारीने वागत नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यावर उपाय म्हणून ऑनलाइन स्वरूपात दंड वसूल करण्याची सूचना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली. याव्यतिरिक्त सत्ताधारी नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक एकनाथ गायकवाड, अमर पाटील आदींनी अनधिकृत फेरीवाल्यांबाबत प्रशासनाला जाब विचारला. कोविडची लागण झाल्यावर बरे होऊन कामावर हजर झालेल्या आयुक्तांनी चांगल्या कामाचे पण कौतुक करण्याचे अवाहन नगरसेवकांना केले. प्रशासन चांगले कामदेखील करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालिका हद्दीतील या कामांना मिळाली मंजुरी -
पालिका हद्दीत नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. याव्यतिरिक्त कळंबोली सेक्टर ११ येथील ६/सी१ येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे सभागृह उभारणीसह प्रभाग क मध्ये मलनिस्सारण वाहिनी टाकणे, मलनिस्सारण केंद्र उभारण्याच्या ६ कोटी ५२ लाखांच्या कामांना मंजुरी, पटेल मोहल्ला येथे लेंडाळे तलावाचे सुशोभीकरण, ३ कोटी १० लाखाच्या कमला मंजुरी, प्रभाग ड मध्ये रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण करणे व रंगीत फुलझाडे, वेळी सूचना फलक लावण्यासाठी ३५ लाखांच्या कामाला मंजुरी, पनवेल शहरातील मासळी मार्केटमध्ये ८२ लाखांचे कोल्ड स्टोरेज, ५३ लाखांचे पत्रे बसविले, प्रभाग १९ मधील उरण रोड येथील श्री संताजी महाराज जगनाडे चौक ते लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटपर्यंत आरसीसी नाला १ कोटी ६७ लाखांच्या कामाला मंजुरी, प्रभाग १८ डॉ. मौलाना आझाद चौक ते महानगरपालिका मुख्यालय डांबरीकरणाच्या ३६ लाखांच्या कामाला मंजुरी.
मालमत्ता कराबाबत संभ्रम दूर करा -
सध्या पालिका क्षेत्रातील रहिवाशांना मालमत्ता कर भरण्यासंदर्भात नोटिसा प्राप्त होत आहेत. सत्ताधारी भाजपच्या वतीने कोणतीही करवाढ केली जाणार नसल्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र मालमत्ता करासंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम वाढत चालला असून हा संभ्रम दूर करण्यासाठी स्वतंत्र महासभा आयोजित करण्याची मागणी शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली.