खारघर हिलवर वाघ दिसल्याची अफवा; वन विभागाने दावा फेटाळला
By वैभव गायकर | Published: November 1, 2022 05:52 PM2022-11-01T17:52:06+5:302022-11-01T17:54:32+5:30
खारघरहिल वर वाघ दिसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. चाफेवाडी येथील रहिवासी असलेल्या किरण पारधी यांनी याबाबत खारघर हिल रोड वरील चौकीमधील सुरक्षा रक्षकांना माहिती दिली.
पनवेल : खारघर हिलवर वाघ दिसल्याच्या अफवेने खारघर वासियांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः खारघर हिलवरील रहिवासी आणि मॉर्निंग ऑकसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये हि भीती जास्त आहे. मात्र, वनविभागाने हा दावा फेटाळला असुन खारघरसह संपुर्ण पनवेल तालुक्यातच वाघाचा वावर नसल्याचे पनवेलचे सहाय्यक वनसंरक्षक डी एस सोनावणे यांनी स्पष्ट केले आहे.
खारघरहिल वर वाघ दिसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. चाफेवाडी येथील रहिवासी असलेल्या किरण पारधी यांनी याबाबत खारघर हिल रोडवरील चौकीमधील सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. 15 दिवसांपूर्वीची ही घटना असून येथील सुरक्षा अधिकारी बाळू पाटील यांनी वनविभाग आणि सिडकोला याबाबत माहिती दिली. वनविभागाने घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. वाघ दिसल्याचा दावा करणाऱ्या किरण पारधी यांची देखील वनविभागाने चौकशी केली असता, किरणच्या सांगण्यात स्पष्टता नसल्याचे वनविभागाचे अधिकारी डी एस सोनावणे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खारघर हिलवरील वाघ दिसल्याची केवळ अफवाच असल्याचे सोनावणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या हिलवर सुरक्षा रक्षक म्हणुन नेमलेल्या सुरक्षा रक्षकांना अद्यापपर्यंत असा अनुभव आला नाही. ऐकिवत माहितीच्या आधारे आम्ही या घटनेची माहिती वनविभागाला दिली असल्याचे येथील सुरक्षा अधिकारी बाळु पाटील यांनी स्पष्ट केले.