मुंबई : घटनेचे सत्य पडताळून न पाहता सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे मेसेज गेल्या शनिवारपासून पसरवले जात आहेत. या अफवा पसरविणाऱ्या चौघांना कुरार पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या, तर अन्य एका पसार साथीदाराचा शोध सुरू आहे. मालाडच्या कुरार परिसरामध्ये गणेशमूर्तीची विटंबना केली गेली, असा मेसेज व्हॉट्सअॅपवर रविवारी रात्रीपासून पसरवला जात आहे. मात्र, असा काही प्रकार घडलेलाच नसून, विनाकारण असे मेसेजेस पसवून लोकांच्या धार्मिक भावना भडकावण्याचे काम काही लोक करत आहेत. नेमक्या गणेशोत्सवात अशा प्रकारच्या अफवा पसरल्याने त्याचा वाईट परिणाम कायदा आणि सुव्यवस्था राखताना होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी या वेळी मुंबई पोलिसांनी कडक भूमिका घेत, पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे, ज्यात चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. एक जण पसार असून, त्याचा शोध सध्या कुरार पोलीस घेत आहेत. विजय वंझारा (२१), अतुल फडतरे (२५), ईश्वरदास घुसिया (४३) आणि भूषण जाधव (२७) अशी अटक चौघांची नावे आहेत. या सर्वांवर धार्मिक भावना दुखावणे, कट रचणे यांसारखी गंभीर कलमे लावण्यात आली आहेत; तसेच पसार आरोपीलाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती कुरार पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
सोशल मीडियावर अफवा पसरविणारे गजाआड
By admin | Published: September 08, 2016 3:16 AM