सोशल मीडियावर कर्फ्यूची अफवा, कोपरखैरणेसह अन्य भागात अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 02:11 AM2020-04-30T02:11:25+5:302020-04-30T02:11:31+5:30
कोपरखैरणेसह अनेक भागातील नागरिकांकडून अन्न धान्यासह अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीवर जोर दिल्याने बुधवारी सकाळी ठिकठिकाणी गर्दी ओसंडली होती.
नवी मुंबई : शहरातील अनेक भागात जनता कर्फ्यू लावल्याच्या अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जात आहेत. त्याच्या भीतीने कोपरखैरणेसह अनेक भागातील नागरिकांकडून अन्न धान्यासह अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीवर जोर दिल्याने बुधवारी सकाळी ठिकठिकाणी गर्दी ओसंडली होती.
नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नागरिक चिंतीत असतानाच शहरात अफवांचे पीक उठवले जात आहे. घणसोली गावामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याचे टाळण्यासाठी ग्रामस्थांनी स्वेच्छेने तीन तारखेपर्यंत बंदची घोषणा केली आहे. त्याचे अनुकरण शहरातील इतरही गावांमध्ये करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु सिडको विकसित नोडमध्ये अशाप्रकारे निर्णय घेऊ शकणारी कोणतीही सर्वसमावेशक यंत्रणा नाही. त्यानंतरही काहींनी संपूर्ण कोपरखैरणेत जनता कर्फ्यू लागू होणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. बुधवारी सकाळी कोपरखैरणेतील प्रत्येक किराणा दुकानाबाहेर तसेच दूध विक्रेत्यांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणचा पुरवठा संपला आहे. तर अचानक दूध खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढल्याने आपल्याकडील पुरवठा काही तासात संपल्याचे दूध पुरवठादार प्रकाश जाधव यांनी सांगितले.
तर बुधवारी दुपारी जुईनगर परिसरात अशाच प्रकारच्या जनता कर्फ्यू लागणार असल्याचे मॅसेज पसरू लागले. सोशल मीडियावर अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले त्यांच्यावर कारवाईची देखील मागणी देविदास हांडेपाटील यांनी पोलिसांकडे केली आहे.