घरोघरी पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:35 AM2019-04-22T01:35:16+5:302019-04-22T01:35:35+5:30

पत्रके वाटण्यावर भर; रसद कमी झाल्याने कार्यकर्त्यांची संख्या घटली; समन्वयाचा अभाव

Runaway workers to reach the house | घरोघरी पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ

घरोघरी पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ

Next

नवी मुंबई : प्रचारासाठी शेवटचा रविवार असल्यामुळे युतीसह आघाडीच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. घरोघरी जाऊन पत्रके वाटली जात होती; परंतु बहुतांश पदाधिकाऱ्यांना आवश्यक रसद मिळाली नसल्यामुळे प्रचारामधील कार्यकर्त्यांची संख्या कमी झाल्याचे व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे पाहावयास मिळाले.

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधील एकही प्रमुख उमेदवार नसल्यामुळे आचारसंहिता सुरू झाल्यापासून प्रचारामध्ये उत्साहच दिसला नाही. १३ ते २१ एप्रिल दरम्यान दोन रविवारसह एकूण पाच सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे प्रचारामध्ये गती येईल अशी अपेक्षा होती; परंतु सुरुवातीच्या चारही सुट्टींमध्ये कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरलेच नाहीत. शेवटची सुटी असल्यामुळे रविवारी सर्वपक्षीय पदाधिकाºयांना घरोघरी जाऊन पत्रके वाटण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे सकाळपासून अनेक प्रभागांमध्ये नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत असल्याचे पाहावयास मिळत होते. राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार आनंद परांजपे यांनी स्वत: बेलापूर मतदारसंघामधून रॅली काढली. तुर्भे स्टोअरपासून एमआयडीमधील इतर विभागामधील नागरिकांशी संवाद साधला. बेलापूर ते ऐरोलीदरम्यान पदाधिकारी घरोघरी जाऊन पत्रके वाटत होते. शिवसेना व भाजप पदाधिकाºयांनीही पत्रके व खासदारांचा जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

यापूर्वी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीच्या तुलनेमध्ये प्रचारामध्ये उत्साह दिसला नाही. पदाधिकाºयांना स्वखर्चाने प्रचार करावा लागत आहे. याशिवाय निवडणूक आयोगाचीही करडी नजर असल्याने प्रचारामधील कार्यकर्त्यांची संख्या कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. रसदच मिळाली नसल्यामुळे ठरावीक पदाधिकाºयांना घेऊन घरोघरी जाण्यावर भर दिला असल्याची माहिती पदाधिकाºयांनी दिली. पुढील सहा दिवस रोज सकाळी व सायंकाळी नागरिकांची भेट घेण्यावर लक्ष दिले जाणार असल्याचेही अनेक पदाधिकाºयांनी सांगितले.

समन्वयाचा अभाव ठरतेय डोकेदुखी
अनेक प्रभागांमध्ये युती व आघाडीच्या पदाधिकाºयांमध्ये समन्वय नाही. काही प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी पहिली पत्रके वाटली व नंतर ती काँगे्रसच्या पदाधिकाºयांना दिली. यामुळे आम्ही आता पुन्हा तीच पत्रके वाटायची का, असा प्रश्न उपस्थित झाला. इतर पक्षांमध्येही समन्वयाचा अभाव असून नेते व उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

नेत्यांकडून प्रचाराचा आढावा
निवडणूक जवळ आल्यानंतरही नवी मुंबईमध्ये अद्याप प्रचार अपेक्षित गतीने होत नाही. अनेक नागरिकांना उमेदवार कोण याचीही माहिती नाही. पत्रके अनेक घरांमध्ये गेली नाहीत, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत नाही, नेत्यांनी प्रत्येक प्रभागाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून कोण पदाधिकारी काम करत आहे व कोण दुर्लक्ष करतेय याची माहिती घेतली जात आहे.

खर्च करायचा कोणी?
प्रचारासाठी शेवटचा रविवार असतानाही अनेक प्रभागांमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला नाही. प्रचार साहित्य पोहोचविले असले तरी कार्यकर्त्यांसाठी चहा, नाष्ट्याची सोयही पदाधिकाºयांना स्वखर्चाने करावी लागत आहे. प्रचारासाठी अपेक्षित रसद पोहोचलीच नसल्यामुळे प्रचारामध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी झाली असून खर्च करायचा कोणी, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

निवडणूक विभागाचे लक्ष
प्रचारावर निवडणूक विभागाने बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे, यामुळे प्रचारासाठी जास्त कार्यकर्ते, झेंडे व इतर साहित्य टाळले जात आहे. जेवणावळ्या व इतर खर्चामध्येही कपात केली जात आहे. आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होण्याची भीती असल्यामुळे पदाधिकारीही सावध राहूनच प्रचार करत आहेत.

Web Title: Runaway workers to reach the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.