नवी मुंबई : आचारसंहिता लागू होताच पनवेलसह नवी मुंबई परिसरामधील अनधिकृत बॅनर हटविण्याचे काम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सुरू केले आहे. दिवसभरामध्ये शेकडो होर्डिंग उतरविण्यात आले आहेत; परंतु सायंकाळपर्यंत उद्घाटन व भूमिपूजनाच्या पाट्या झाकण्यात आल्या नव्हत्या.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये उद्घाटन व भूमिपूजनाचा धडाका सुरू होता. प्रत्येक नोडमध्ये महापालिकेने व खासदार, आमदारांच्या निधीमधून केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. कामांचे श्रेय घेण्यासाठी शेकडो होर्डिंग लावण्यात आले होते. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये १२०० पेक्षा जास्त होर्डिंग लावण्यात आले होते. महापालिका प्रशासनानेही अनेक ठिकाणी माहिती फलक लावले होते. होर्डिंगबाजीमुळे शहर विद्रूप दिसू लागले होते. रविवारी आचारसंहिता जाहीर होताच सोमवारी पहाटेच प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रामधील होर्डिंग हटविण्यास सुरवात झाली. दिवसभर मुख्य रस्ते, चौक व महत्त्वाच्या ठिकाणी असलेले अधिकृत व अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले. वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांवरील होर्डिंग मात्र सायंकाळनंतरही जैसे थे होते. पनवेल महापालिकेनेही सकाळीच होर्डिंग हटविण्याची मोहीम सुरू केली. दिवसभर कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. शहरातील बॅनर गायब झाल्यामुळे दक्ष नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेक ठिकाणी होर्डिंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला होता.आचारसंहितेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षांचा किंवा नेत्यांचा प्रचार होईल असे होर्र्डिंग लावू नयेत. उद्घाटन व भूमिपूजनाच्या पाट्यांवरही कागद लावणे आवश्यक आहे; परंतु पहिल्या दिवशी शहरातील कोणत्याच पाट्या झाकण्यात आलेल्या नाहीत. वाशीतील शिवाजी चौक, महापालिका रुग्णालय, मार्केट, वाचनालय, उद्यान येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. तेथे दर्शनी भागामध्ये उद्घाटन व भूमिपूजनाचे फलक बसविण्यात आले आहेत. हे सर्व फलक तत्काळ हटविण्यात यावेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे; परंतु अद्याप प्रशासनाने फलक झाकण्याची कार्यवाही सुरू केलेली नाही. काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, शहरामध्ये १११ प्रभाग आहेत. एका प्रभागामध्ये ५ ते १५ नामफलक आहेत. काही ठिकाणी त्यांची संख्या जास्त आहे.यामुळे या पाट्या झाकण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागू शकतात. पहिल्यांदा होर्डिंग हटविण्यास प्राधान्य दिले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील व अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अमरिश पटनिगिरे यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.नामफलकांचे राजकारणनवी मुंबईमध्ये निवडणुकीपूर्वी श्रेयवादाचे राजकारण सुरू होते. ऐरोलीमध्ये उद्घाटनावरून शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये राडा झाला होता. दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. प्रशासनाने वेळेत या पाट्या झाकल्या नाहीत किंवा झाकण्यामध्ये पक्षपात केल्यास पुन्हा वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पनवेल, उरणमध्ये ४७१ होर्डिंगपनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सोमवारी सकाळीच होर्डिंग काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. दिवसभरामध्ये तब्बल ४२५ होर्डिंग हटविण्यात आले. उरणमध्येही ४६ होर्डिंग हटविण्यात आले आहेत. दिवसभर कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. सायंकाळनंतरही काही ठिकाणचे होर्डिंग उतरविण्यात आले नव्हते. मंगळवारी शिल्लक राहिलेले सर्व होर्डिंग हटविण्यात येणार आहेत.
बॅनर काढण्यासाठी प्रशासनाची धावपळ; शेकडो होर्डिंग उतरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:58 AM