फेरीवाल्यांविरोधात पालिकेची धडक मोहीम

By admin | Published: March 26, 2017 05:30 AM2017-03-26T05:30:53+5:302017-03-26T05:30:53+5:30

महापालिका कार्यक्षेत्रामधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम सुरू झाली आहे. कोपरखैरणे, वाशी व

Running campaign against hawkers | फेरीवाल्यांविरोधात पालिकेची धडक मोहीम

फेरीवाल्यांविरोधात पालिकेची धडक मोहीम

Next

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम सुरू झाली आहे. कोपरखैरणे, वाशी व तुर्भेमधील विनापरवाना रसवंतीगृह चालविणाऱ्यांसह इतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नवी मुंबईमधील रस्ते, पदपथ व इतर सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. शुक्रवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व उपआयुक्त अमरीश पटनिगिरे यांनी सर्वच विभाग अधिकाऱ्यांना विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोपरखैरणेचे विभाग अधिकारी अशोक मढवी, वाशीतील महेंद्रसिंग ठोके व तुर्भेच्या अंगाई साळुंखे यांनी कारवाई सुरू केली आहे. शहरात सद्यस्थितीमध्ये राज्यातील विविध भागांतून उसाचे गुऱ्हाळ चालविणारे व्यवसाय करण्यासाठी आले आहेत. याशिवाय इतर ज्युस विक्रेत्यांनीही रस्ते, पदपथ व महत्त्वाच्या जागांवर अतिक्रमण केले आहे. यामुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीला व रहदारीला अडथळा निर्माण होऊ लागला होता. यामुळे विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या रसवंतीगृहचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. लाकडी चरखे व इतर साहित्यही जप्त करण्यात आले असून, ते कोपरखैरणे डंपिंग ग्राउंडवर ठेवण्यात आले आहे.
रसवंतीगृहचालकांविरोधात कारवाई सुरू झाल्याने शनिवारी अनेकांनी व्यवसाय बंद ठेवले आहेत. फेरीवाल्यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेच्या पथकाकडून नियमितपणे कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कारवाई सुरू केल्यानंतर सायंकाळी आयुक्तांच्या बदलीचे वृत्त धडकले असले तरी प्रत्यक्षात कारवाईमध्ये खंड पडू दिला जाणार नाही. सोमवारपासून नेरुळ, बेलापूर, घणसोली व ऐरोलीमध्येही कारवाई सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

आयुक्त व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू झाली आहे. पदपथ, रस्ते व इतर महत्त्वाच्या जागा अडविणाऱ्या रसवंतीगृहचालकांवरही कारवाई केली असून ती नियमितपणे सुरू राहणार आहे.
- अशोक मढवी,
विभाग अधिकारी, कोपरखैरणे

Web Title: Running campaign against hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.