निधी नसताना वृद्धाश्रम चालविणे जिकिरीचे - जयेंद्र गुंजाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 11:50 PM2020-08-27T23:50:57+5:302020-08-27T23:51:07+5:30
कोरोनामुळे कोणीही येत नसल्याने ज्येष्ठांची माणूस भेटीसाठी घालमेल
अलिबाग : कोरोनाच्या जागतिक संकटाने तत्त्वज्ञानापासून ते सामान्य जीवन संघर्षाचे पैलू नव्याने पाहायला लावले. सोशल डिस्टन्सिंगमुळे बाहेरील व्यक्ती भेटत नसल्याने रोगापेक्षा उपाय भयंकर, असे म्हणण्याची वेळ आधीच विजनवासाचे चटके सोसत असलेल्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांवर आली आहे. करोनाचे फंडे काहीही असो. आप्तांनीही पाठ फिरवलेल्या अनेक आश्रमांतील वृद्धांची अशीच माणूसभेटीसाठी घालमेल होत आहे. तर कोणताही निधी नसताना वृद्धाश्रम चालविणे जिकिरीचे झाले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपर्ण जगभरात टाळेबंदी व संचारबंदी करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण जग थांबले. काहींना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे रोजची देवाण-घेवाणीची आर्थिक चैन तुटली. नागरिकांना आता संसार कसा चालवायचा, असा प्रश्न पडला होता. त्याच वेळी वृद्धाश्रम कसे चालवायचे, त्यामध्ये असलेल्या आजी-आजोबांचा कसा सांभाळ करायचा, असे विविध प्रश्न सतावत होते. मात्र अशावेळी आयुष्यभराची जमा केलेली ठेवी मोडून वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे संगोपन केले असल्याचे वृद्धाश्रम चालक अॅड. जयेंद्र गुंजाळ म्हणाले.
आरोग्याच्या अनेक समस्यांशी लढा देत असलेल्या ज्येष्ठांना या वयात धावपळ करणे शक्य होत नाही. मात्र आजही अनेक ज्येष्ठ नागरिकांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. कितीतरी वर्षांपूर्वीचे खटले आजही सुरूच असल्याने या सर्व गोष्टींमुळे त्यांना उतारवयातील मोठी दगदग सहन करावी लागते. यात त्यांना मोठा आर्थिक खर्चही सोसावा लागतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे खटले त्वरित निकाली काढावेत, असे अॅड. जयेंद्र गुंजाळ यांनी सांगितले.
आयुष्यभर धकाधकीचे आयुष्य जगल्यानंतर उत्तरार्ध आनंदात आणि निवांत जावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. वाढत्या प्रदूषणाचाही त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यांना फिरण्यासाठी निवांत जागा मिळावी यासाठी आता पुढाकार घेण्याची गरज आहे. वस्ती-वस्तीमध्ये विरंगुळा सेंटर असावेत, बगीचे असावेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबाचा आधार नसतो त्यामुळे नाइलाजाने त्यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. त्यामुळे वृद्धाश्रमांचे रूपांतर आनंदाश्रमात व्हावे, याचाही विचार होण्याची गरज असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले.
वृद्धांना द्यावे लागले अनेक समस्यांना तोंड
आपल्या समाजव्यवस्थेत नवीन काळाशी जुळवून घेण्यासाठी अजूनही कोणते नवीन कौटुंबिक किंवा कुटुंबाबाहेरील घटक यात आपण आणून संपूर्ण सामाजिक व्यवस्थेला एक नावीन्याची जोड देऊ शकतो, याबाबत विचार, तशी मागणी, आपण आपल्याच समाजाकडून, सरकारकडून किंवा संपूर्ण व्यवस्थेकडून का करीत नाही, असा प्रश्न वृद्धाश्रम चालक अॅड. जयेंद्र गुंजाळ यांना पडला आहे.
मुले आणि वृद्ध यांची काळजी, संगोपन हे स्त्रियांचे पारंपरिक कार्यक्षेत्र होते, मात्र आता गेल्या दोन ते तीन दशकांत स्त्रिया अर्थार्जन करून, कुटुंबाचा आर्थिक स्तंभ होऊ लागल्या आहेत. अशा वेळी त्यांची पारंपरिक काळजी वाहकाची भूमिका बºयाच अंशी बदलली आहे. याची दखल, या पोकळीचे अर्थकारणामुळे वृद्धांच्या बाबतीत संगोपन, देखभाल या साºयासाठी म्हणावी तशी व्यवस्था अजून अस्तित्वात आलेली नाही.